पीटीआय, नवी दिल्ली

राज्यघटना हा आमचा दीपस्तंभ असून विकसित भारत घडवण्यासाठी सर्व राज्यांबरोबर एकत्र काम करण्यासाठी आपण वचनबद्ध असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी निकालानंतर संध्याकाळी उशिरा केले. निकालानंतर मोदी यांनी भाजप मुख्यालयामध्ये जल्लोष साजरा करण्यासाठी जमलेल्या पक्ष कार्यकर्ते आणि नेत्यांसमोर विजयाचे भाषण केले. त्यामध्ये त्यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि तेलुगू देसम पक्षाचे नेते एन चंद्राबाबू नायडू यांचा उल्लेख केला. तसेच आपण रालोआ म्हणून एकत्र काम करणार असल्याचेही वारंवार सांगितले.

भाजप राज्यघटना बदलणार असल्याचा जोरदार प्रचार विरोधी पक्षांनी निवडणुकीदरम्यान केला होता. त्या पार्श्वभूमीवर राज्यघटना हा आमचा मार्गदर्शक दीपस्तंभ असल्याचे मोदी यांनी सांगितले. तसेच आपल्या तिसऱ्या कार्यकाळात मोठे निर्णय घेतले जातील आणि भ्रष्टाचार समूळ उपटून काढण्यावर भर दिला जाईल असा दावा त्यांनी केला. ते म्हणाले की, ‘‘भ्रष्टाचाराविरोधातील लढाई दिवसेंदिवस कठीण होत आहे. राजकीय हितासाठी भ्रष्टाचाराचे निर्लज्जपणे उदात्तीकरण केले जात आहे. आपल्या तिसऱ्या कार्यकाळात सर्व प्रकारचे भ्रष्टाचार उखडमून टाकण्यावर रालोआचा भर असेल.’’

हेही वाचा >>>जुन्या मित्रांबरोबर लवकरच चर्चा; निकालानंतर राहुल गांधी यांची घोषणा, खरगे यांचा मोदींवर हल्लाबोल

या भाषणामध्ये मोदी यांनी आपल्या घटलेल्या संख्याबळाचा उच्चार केला नाही, पण विधानसभा निवडणुकांमध्ये मिळालेल्या विजयावर भर दिला. तसेच मध्य प्रदेश, गुजरात, छत्तीसगड, ओडिशा, दिल्ली, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये भाजपला मिळालेल्या यशाचीही प्रशंसा केली. त्याचवेळी काँग्रेसचा अनेक राज्यांमधून सफाया झाला असल्याची टीका त्यांनी केली. इंडिया आघाडीला एकूण मिळालेल्या जागा भाजपच्या जागांपेक्षा कमी असल्याचेही त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांच्या लक्षात आणून दिले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आमची राज्यघटना हा आमचा मार्गदर्शक दीपस्तंभा आहे. मला याची खात्री द्यायची आहे की भारताला एक विकसित देश करण्याच्या आमच्या निर्धाराच्या दिशेने काम करण्यासाठी केंद्र सरकार सर्व राज्यांबरोबर काम करेल, मग राज्यांमध्ये सत्तेत कोणीही असो. नरेंद्र मोदी, पंतप्रधान