पेगॅसस घोटाळा आणि कृषी कायद्यांच्या मुद्द्यांबाबत संसदेच्या अधिवेशनाचे कामकाज सतत विस्कळीत केले जात आहे. प्रयत्न करूनही सरकार आणि विरोधकांमधील गोंधळ कमी होत नाही. दरम्यान, मंगळवारी संसदीय पक्षाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. मंगळवारी सकाळी झालेल्या भाजपा खासदारांच्या बैठकीत विरोधकांकडून वारंवार संसेदचं कामकाज बंद पाडणं हा संसदेचा, घटनेचा, लोकशाहीचा आणि लोकांचा अपमान असल्याचे मोदी म्हणाले.

संसदेच्या कामकाजादरम्यान कॅबिनेट मंत्र्याकडून कागद हिसकावल्याचा आणि तृणमूल काँग्रेसचे राज्यसभा खासदार डेरेक ओ’ब्रायन यांच्या ‘पापडी चाट’च्या टीकेचा संदर्भ देत पंतप्रधान म्हणाले की, हा संसदेचा अपमान झाला आहे. याआधी, २७ जुलै रोजी भाजप संसदीय पक्षाच्या बैठकीत पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला होता आणि म्हटले होते की हा पक्ष सभागृहाचे कामकाज चालू देत नाही.

नरेंद्र मोदी म्हणाले होते की, “जेव्हा करोनावर बैठक बोलावण्यात आली तेव्हा काँग्रेसने बहिष्कार टाकला आणि इतर पक्षांना येण्यापासून रोखले.” त्यामुळे पंतप्रधान मोदींनी भाजप खासदारांना काँग्रेस आणि विरोधकांचे हे काम जनतेसमोर आणि माध्यमांसमोर उघड करण्याचे आवाहन केले होते.