पीटीआय, नवी दिल्ली
‘सारे जग विविध संकटांनी त्रस्त असताना भारत स्थिरतेचे प्रतीक म्हणून उदयाला आला आहे,’ असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी व्यक्त केले. दिवाळीनिमित्त भारतीय नागरिकांना उद्देशून त्यांनी पत्र लिहिले. ‘ऑपरेशन सिंदूर’, नक्षलवाद्यांविरुद्ध लढ्यातील यशाचा त्यांनी पत्रात उल्लेख केला.
वस्तू आणि सेवा कर कमी करणे हा सरकारचा ऐतिहासिक निर्णय असल्याचे ते म्हणाले. या निर्णयामुळे जनता ‘जीएसटी बचत उत्सव’ साजरा करीत असून, कोट्यवधी रुपये त्यामुळे वाचले आहेत. हे सर्व प्रयत्न आपल्याला विकसित भारताकडे घेऊन जातील, असे असे मोदींनी सांगितले. ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेला चालना देण्यासाठी स्वदेशीचा स्वीकार करण्याचे आवाहन त्यांनी केले.
मोदी म्हणाले, ‘ऊर्जा आणि उत्साहाने भरलेल्या या दिवाळीनिमित्त सर्वांना शुभेच्छा. अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीनंतरची ही दुसरी दिवाळी आहे. सदाचरणाचा सदैव स्वीकार करा, हे आपल्याला प्रभू श्री रामांनी सांगितले आहे. तसेच, अन्यायाविरुद्ध लढण्याचीही ताकद दिली आहे. याचे उत्तम उदाहरण आपण काही महिन्यांपूर्वी ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान पाहिले आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान भारताने केवळ सदाचरणाचा पुरस्कार केला नाही, तर अन्यायाचाही बदला घेतला. देशात अगदी दुर्गम जिल्ह्यातही दिवाळीनिमित्त आज प्रथमच दिवे लागले आहेत, म्हणून ही दिवाळी खास आहे. या जिल्ह्यांतून नक्षलवाद आणि माओवादी दहशतवाद मुळापासून उखडून टाकला आहे. नजीकच्या काळात अनेकांना हिंसेचा मार्ग सोडून, राज्यघटनेवर विश्वास ठेवून विकासाच्या मुख्य धारेत येताना आपण पाहिले आहे. देशासाठी ही खूप मोठी उपलब्धी आहे.’
‘जग विविध संकटातून जात असताना भारत स्थिरता आणि संवेदनशीलतेचे प्रतीक म्हणून पुढे आला आहे. नजीकच्या भविष्यात जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था होण्याकडे आपली वाटचाल सुरू आहे,’ असे मोदी म्हणाले.
