अमेरिकेची नासा ही अवकाश संशोधन संस्था पाणी व दुष्काळ यांच्या अभ्यास करण्यासाठीचा एक उपग्रह भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्रोच्या मदतीने सोडणार आहे.
   नासा व इस्रो यांच्या सिंथेटिक अ‍ॅपरचर रडार मोहिमेंतर्गत येत्या सात वर्षांत उपग्रहांची मालिकाच अवकाशात सोडली जाणार आहे. बर्फ, ढग, जमिनीची उंची या बाबींचा अभ्यास करण्यासाठी आईससॅट-२ हा उपग्रह सोडला जाणार आहे. ग्रॅव्हिटी रिकव्हरी व हवामान प्रयोगांसाठी ग्रेस हा उपग्रह सोडला जाणार आहे. महासागराच्या स्थानशास्त्रीय अभ्यासासाठीही वेगळा उपग्रह सोडला जाणार आहे. हे सर्व उपग्रह साधारण बाराच्या आसपास असतील. त्यात काही संवेदक लावले जातील. पृथ्वी विज्ञानातील प्रक्रिया समजून घेण्यासाठी या उपग्रहांचा उपयोग होणार आहे. पृथ्वीवरील जमीन, हवा व अवकाश या बाबींचा अभ्यास करण्यासाठी पृथ्वीच्या अंतर्गत जोडणी असलेल्या नैसर्गिक प्रणाली यांचा अभ्यास करण्यात येणार आहे. पृथ्वी ग्रहावर नेमके कुठले बदल होत आहेत याचा अवकाशातून अभ्यास करण्यासाठी संगणकीय साधने विकसित केली जाणार आहेत. नासा या वर्षी पृथ्वी विज्ञानाच्या अभ्यासासाठी तीन उपग्रह सोडणार असून, त्याचा जलचक्राचा अभ्यास व राष्ट्रीय जलनिर्णय धोरण यासाठी उपयोग होणार आहे.
   द ग्लोबल प्रेसिपिटेशन मेजरमेंट कोअर ऑब्झर्वेटरी हा जपानचा उपग्रह  उद्या म्हणजे २७ फेब्रुवारीला सोडला जाणार आहे. पाऊसमान व हिमवृष्टी यांची पहिली जागतिक निरीक्षणे हा उपग्रह देणार आहे. आंतरराष्ट्रीय अवकाशस्थानकात जूनमध्ये आयएसएस-रॅपिडस्कॅट हे साधन जूनमध्ये पाठवले जाणार असून, त्यात जागतिक महासागरी वाऱ्यांचा अभ्यास केला जाईल. हवामान संशोधन, हवामान, सागरी हवामान अंदाज, वादळे व चक्रीवादळांचा अंदाज यासाठी त्यांचा उपयोग होईल. सॉइल माइस्चर अ‍ॅक्टिव्ह पॅसिव्ह हा उपग्रह नोव्हेंबरमध्ये पाठवण्यात येईल तो जलस्रोत व्यवस्थापनात व पाण्याची उपलब्धता ठरवण्यात मदत करील. त्यामुळे वनस्पतींच्या वाढीचा व कृषी उत्पादकतेचा अंदाज त्यात घेता येईल. पुरांचा अंदाज घेऊन लोकांचे प्राण वाचवणे शक्य होणार आहे असे नासाने म्हटले आहे.