इराण व इस्रायल या दोन देशांमध्ये सुरू असलेल्या संघर्षाची झळ तिथल्या सामान्य नागरिकांना सोसावी लागत आहे. दोन्ही देशांकडून एकमेकांवर क्षेपणास्त्रांचा मारा व ड्रोन हल्ले केले जात आहेत. तर दुसरीकडे रशिया व युक्रेन मधील युद्ध अजून थांबलेलं नाही. युक्रेनमध्ये युद्धजन्य परिस्थिती असून त्या पार्श्वभूमीवर महिला व लहान मुलांचं मोठ्या प्रमाणात इतर देशांमध्ये स्थलांतर झालं आहे. त्यापैकीच एक म्हणजे नास्त्या बोरिक. सात वर्षीय नास्त्या ही कॅन्सरग्रस्त होती. कॅन्सरवर उपचार घेण्यासाठी ती इस्रायलमध्ये स्थलांतरित झाली होती. एका सेवाभावी संस्थेत तिच्यावर उपचार सुरू होते. इराणनं इस्रायलवर केलेल्या हवाई हल्ल्यात नास्त्या व तिच्या कुटुंबातील चार सदस्यांचा मृत्यू झाला आहे. CNN या वृत्तसंस्थेनं याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.

इराणनं रविवारी इस्रायलमधल्या तेल अवीवच्या दक्षिणेकडील बाट याम या शहरावर हवाई हल्ला केला. या हल्ल्यात युक्रेनचे पाच नागरिक मारले गेले. युक्रेनचे नागरिक इराणच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडल्याच्या बातमीला इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष आयझॅक हेर्दोझ यांनी दुजोरा दिला आहे. इस्रायलमध्ये नास्त्या व तिच्या कुटुंबाला मदत करणाऱ्या संस्थेतील एवजेनिया विरोव्लिआन्स्कि म्हणाल्या, “तिचा मृत्यू व्हायला नको होता. हे असं संपायला नको होतं. हे कधीच व्हायला नको होतं. युक्रेनमधील युद्धातून इथे सुरक्षित राहता येईल, या आशेने हे कुटुंब इथं आलं होतं आणि आता सगळं असं संपलं.” इस्रायलमधल्या Chance 4 Life या संस्थेत नास्त्या व तिच्या कुटुंबियांनी आश्रय घेतला होता.

विरोव्लिआन्स्कि पुढे म्हणाल्या, “संस्थेतल्या एका मुलीच्या वाढदिवसानिमित्त मी नास्त्याला मागच्या आठवड्यात पाहिलं होतं. नास्त्याच्या येण्याने सगळ्यांनाच आनंद झाला होता. त्यावेळी सगळे खूप आनंदात होते. हल्ला झाला त्या रात्री स्फोट झाल्यानंतर नक्कीच काहीतरी झालंय असं आम्हाला वाटलं. हल्ला कोणत्या ठिकाणी झाला, त्याबाबत माहिती घेतल्यानंतर ते ठिकाण आमच्या ओळखीचं होतं. आम्ही तिथल्या लोकांना फोन केले परंतु कोणीही फोन उचलले नाहीत. सगळं ठीक असावं अशी आम्ही आशा केली होती.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष आयझॅक हेर्झोग नास्त्याच्या मृत्यूबद्दल सविस्तर माहिती देताना म्हणाले, “कॅन्सरग्रस्त नास्त्याला उपचारांची आवश्यकता असल्यानं तिचं कुटुंब डिसेंबर २०२२ मध्ये इस्रायलमध्ये आलं होतं. नास्त्यावर सुरूवातीला उपचार करण्यात आले तेव्हा तिची प्रकृती बरी होत होती. परंतु, नंतर पुन्हा तिच्या रक्तातील कॅन्सरचं प्रमाण वाढलं. इराणनं केलेल्या हवाई हल्ल्यात नास्त्या बोरिक व तिच्या कुटुंबातील चार सदस्यांचा मृत्यू झाला आहे. नास्त्याची आई – मारिया ( वय ३० वर्ष), आजी- लेना (वय ६० वर्ष), तसेच कोन्स्टान्टिन (वय ९) व इलिया (वय १३) या भावंडांचा मृत्यू झाला आहे. नास्त्याचे वडील आर्टेम बोरिक हे युक्रेनच्या सैन्यात असून रशियाविरुद्ध युद्धात सहभागी आहेत.”