NATO Chief Message to Donald Trump: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे पदग्रहण केल्यापासूनच सातत्याने चर्चेत राहिले आहेत. आधी पदावर येताच काढलेले ४२ अध्यादेश, त्यानंतर अवघ्या जगाला वेठीस धरणारे रेसिप्रोकल टॅरिफ, मग भारत-पाकिस्तान संघर्षात मध्यस्थी केल्याचं श्रेय आणि आता इराण-इस्रायल युद्धात अमेरिकेचा प्रत्यक्ष सहभाग अशा अनेक मुद्द्यांमुळे डोनाल्ड ट्रम्प सातत्याने जागतिक चर्चेचा विषय ठरले. इराण-इस्रायल युद्ध आपल्यामुळे थांबल्याचा दावा त्यांनी नुकताच केला आहे. आता NATO अर्थात नॉर्थ अॅटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशनचे प्रमुख मार्क रुट यांनी पाठवलेला खासगी मेसेज ट्रम्प यांनी जगजाहीर केला आहे.
इराणवरील हल्ल्यानंतर आला संदेश
नाटोचे प्रमुख मार्क रुट यांनी इमेरिकेनं इराणमधील आण्विक तळांवर हल्ला केल्यानंतर हा मेसेज ट्रम्प यांना पाठवला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या मेसेजमध्ये लगेचच होणाऱ्या नाटोच्या परिषदेचा संदर्भ देण्यात आला आहे. इराणवरील हल्ल्यानंतर या परिषदेसाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी उपस्थिती लावली होती. त्यामुळे हल्ल्यानंतरच हा मेसेज मार्क रूट यांनी पाठवल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
काय आहे डोनाल्ड ट्रम्प यांना पाठवलेल्या मेसेजमध्ये?
मार्क रुट यांनी पाठवलेल्या मेसेजमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचं तोंडभरून कौतुक केलं आहे. इराणवरील हल्ल्यासाठी ट्रम्प यांचं अभिनंदन केलं असून आत्तापर्यंत कुणीही असं काही करण्याची हिंमत केली नसल्याचंही नमूद करण्यात आलं आहे. तसेच, गेल्या अनेक दशकांत अमेरिकेच्या कोणत्याही अध्यक्षाला जे मिळवता आलं नाही, ते डोनाल्ड ट्रम्प यांना साध्य करता येणार आहे, असही या मेसेजमध्ये म्हटलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या आगामी नाटो परिषद बैठकीतील उपस्थितीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या कलाने गोष्टी व्हाव्यात, म्हणून मार्क रुट यांनी हा कौतुक करणारा मेसेज पाठवल्याचं बोललं जात आहे.
वाचा मार्क रुट यांनी पाठवलेला मेसेज…
इराणमध्ये तुम्ही केलेल्या निर्णायक कारवाईसाठी अभिनंदन आणि आभार. ते पाऊल खरंच असामान्य असं होतं. कुणीही असं काही करण्याची हिंमत केली नव्हती. या कारवाईमुळे आपण सगळेच सुरक्षित झालो.
आज संध्याकाळी तुम्ही हेगमध्ये असंच आणखी एक मोठं यश संपादित करणार आहात. हे सोपं नव्हतं, पण आपण त्या सगळ्यांकडून ५ टक्क्यांच्या मुद्द्यावर सहमत करण्यात यशस्वी ठरलो.
डोनाल्ड, अमेरिका, युरोप आणि संपूर्ण जगाला अत्यंत महत्त्वाचे असे क्षण तुम्ही दाखवलेत. गेल्या अनेक दशकांत कोणत्याही अमेरिकन अध्यक्षाला जे साध्य करता आलं नाही, ते तुम्ही साध्य कराल.
युरोप खूप मोठी किंमत चुकवणार आहे. त्यांना तशी किंमत चुकवावीच लागेल. आणि हे तुमचं यश असेल.
तुमचा प्रवास चांगला होवो, हिज मॅजेस्टींसोबत जेवणासाठी भेटुयात!
मार्क रुट
युरोपचा उल्लख चर्चेचा विषय
मार्क रूट यांनी मेसेजमध्ये युरोपचा केलेला उल्लेख चर्चेचा विषय ठरला आहे. “युरोप मोठी किंमत चुकवणार आहे” हा उल्लेख प्रामुख्याने डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफसंदर्भात असल्याचा अंदाज आहे. नाटोशी संबंधित सर्व सदस्य राष्ट्रांना त्यांच्या राष्ट्रीय उत्पन्नातील फक्त ५ टक्के उत्पन्न हे संरक्षण विभागावर खर्च करण्यासंदर्भातल्या करारावर स्वाक्षरी करण्यास राजी करण्यात अमेरिकेला यश आलं आहे.
मेसेज पाठवण्यासाठी Signal App चा वापर?
दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी अमेरिकेने येमेनमधील बंडखोर हुती गटावर केलेल्या हल्ल्यावेळी चर्चेत आलेल्या सिग्नल अॅपवरूनच मार्क रूट यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना हा मेसेज पाठवला असण्याचा अंदाज आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या Truth या सोशल मीडिया अकाऊंटवरून या मेसेजचे स्क्रीनशॉट शेअर केले असून त्याच्या डिझाईनवरून हा मेसेज सिग्नल अॅपवरूनच पाठवाला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे, हुती बंडखोरांवर हल्ल्यावेळी सिग्नल अॅपसंदर्भात विचारणा केली असता आपल्याला त्याबाबत काहीही माहिती नाही, असं ट्रम्प यांनी म्हटलं होतं.
काय आहे Signal App?
हुती बंडखोरांवरील हल्ल्यावेळी अमेरिकेच्या कारवाईसंदर्भातील महत्त्वाची माहिती या अॅपवरून प्रशासकीय पातळीवर शेअर करण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. पण सिग्नल अॅप त्यासाठी योग्य आणि सुरक्षित नसल्याचं सिद्ध झाल्यानंतर ट्रम्प यांनी आपल्याला त्या अॅपबद्दल काही माहितीच नसल्याची भूमिका घेतली होती.