हेग (नेदरलँड्स) : ‘नेटो’च्या सदस्य देशांच्या नेत्यांनी संरक्षण खर्चात मोठी वाढ करण्याचे बुधवारी मान्य केले, तसेच एकमेकांचे संरक्षण करण्याचा निर्धारही व्यक्त केला. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यासाठी ‘नेटो’वर दबाव वाढवला होता. ट्रम्प यांच्यासह ‘नेटो’ संघटनेचे सदस्य देशांचे प्रतिनिधी नेदरलँड येथे शिखर परिषदेसाठी जमले आहेत.

‘‘सदस्य देशांनी २०३५पर्यंत मुख्य संरक्षण खर्च तसेच संरक्षण व सुरक्षाविषयक खर्चात दरवर्षी जीडीपीच्या पाच टक्के गुंतवणूक करण्याचे मान्य केले आहे,’’ असे ‘नेटो’कडून सांगण्यात आले. संरक्षणावरील खर्चाचे उद्दिष्ट ठरवणे हा या शिखर परिषदेसमोरील मुख्य अजेंडा होता. त्यापूर्वी, संरक्षणासाठी जीडीपीच्या पाच टक्के रक्कम खर्च करण्यास संघटनेचे सदस्य राजी होतील, असा विश्वास ‘नेटो’चे सरचिटणीस मार्क रुते यांनी व्यक्त केला होता.

अमेरिकेने युरोपमधून इतर ठिकाणी आपले लक्ष वळवल्यामुळे ३२ देशांच्या ‘नेटो’ संघटनेमधील अन्य सदस्य देश संरक्षणावरील खर्च वाढवण्यास तयार होतील अशी अपेक्षा होती. तर, स्पेन, बेल्जियम या देशांनी संरक्षणावरील खर्चातील वाढीला नकार दर्शवला होता. युरोपातील अनेक देशांत आर्थिक आव्हाने असून, ट्रम्प यांच्या आयातशुल्क धोरणामुळे या देशांना संरक्षणावरील खर्चात वाढ करणे कठीण असल्याचे सांगितले जात होते. मात्र, सर्व देशांनी संरक्षण खर्चात वाढीस मान्यता दिली.

संरक्षणावर खर्च पाहून मदतीचा निर्णय

संरक्षणवाढीचा निर्णय होण्यापूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी ‘नेटो’ सदस्य देशांवर हल्ला झाला, तर अमेरिका कितपत मदतीला येईल, यावर साशंकता व्यक्त केली. सदस्य देश संरक्षणावरील खर्च किती करतात, यावर ते अवलंबून असेल, असे ट्रम्प म्हणाले. युरोपीय मित्रदेश आणि कॅनडाने जीडीपीच्या पाच टक्के रक्कम संरक्षणावर खर्च करावी, असे त्यांनी सुचविले आहे. ‘नेटो’च्या मूळ करारातील कलम ५ ची व्याख्या अनेक देश अनेक पद्धतीने करतात. मी त्याची अगदी अचूक व्याख्या करीन, असे ट्रम्प म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘इराणमधील आण्विक केंद्रांचे मोठे नुकसान’

हेग : अमेरिकेच्या हल्ल्यामध्ये इराणमधील आण्विक केंद्रांचे मोठे नुकसान झाल्याचा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी केला. मात्र, याच वेळी या संदर्भात उपलब्ध गुप्तवार्ता निर्णयाप्रत येण्याची नसल्याचेही त्यांनी मान्य केले. ट्रम्प म्हणाले, ‘गुप्तचरांकडून आलेली माहिती निष्कर्षापर्यंत पोहोचण्याची नाही. ‘आम्हाला माहीत नाही. नुकसान खूप मोठे असू शकते,’ अशी माहिती आहे. त्यामुळे मला ती खरी वाटते. हल्ला विनाशकारी होता.’ दरम्यान इराणचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माइल बघेई यांनीही केंद्राचे मोठे नुकसान झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.