पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी दिलेल्या आदेशाला केराची टोपली दाखवत पंजाबचे कॅबिनेट मंत्री नवज्योत सिंग सिद्धू शहीद जवानांच्या अंत्यसंस्काराला गैरहजर राहिले. गुरुवारी पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात देशाच्या चाळीस जवानांना वीरमरण आले. या चाळीस जवानांमध्ये पंजाबाच्या चार जवानांचाही समावेश होता. या सगळ्यांची पार्थिवं आज त्यांच्या मूळ गावी आणण्यात आली आणि तिथे शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शहीद जवान जयमल सिंह यांच्या अंत्यसंस्काराला हजर रहाण्याची जबाबदारी नवज्योत सिंग सिद्धू यांना देण्यात आली होती. यासंदर्भात पोलिसांनाही कळवण्यात आलं होतं. तरीही सिद्धू या अंत्यसंस्काराला गेलेच नाहीत.

सिद्धू यांची पंजाब कॅबिनेटमधून हकालपट्टी करा अशी मागणी आता होऊ लागली आहे. त्यासंदर्भातला एक हॅशटॅगही ट्विटरवर ट्रेंड होतो आहे. सोनी या टीव्ही वाहिनीने नवज्योत सिंग सिद्धू यांना कपिल शर्मा शोमधून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. या वाहिनीने हा निर्णय कायमस्वरूपासाठी घेतला असल्याचंही नमूद केलं आहे. पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यात चाळीस जवान शहीद झाले. त्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली. पाकिस्तानला प्रत्युत्तर दिलेच पाहिजे अशी मागणी होत असतानाच सिद्धू यांनी मात्र पाकिस्तानशी चर्चा करून हा प्रश्न सोडवला पाहिजे असं म्हटलं. त्यामुळे त्यांच्यावर टीकेचा प्रचंड भडीमार झाला. इतकंच नाही तर कपिल शोमधून हकालपट्टी झाल्यावरही ते म्हटले की मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे. मूठभर लोकांमुळे तुम्ही संपूर्ण देशाला (पाकिस्तान) जबाबदार धरता कामा नये. चर्चेने हा प्रश्न कायमस्वरूपी निकाली लागू शकतो.

सिद्धू यांच्याबद्दलची ही दोन वृत्तं प्रसिद्ध होऊन काही वेळ होतो न होतो तोच तिसरं वृत्तही समोर आलं आहे. सिद्धू यांनी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा आदेश पाळला नाही. शहीद जवानाच्या अंत्यसंस्कारालाही ते गेले नाहीत.