नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी झालेली सुप्रिया सुळे व प्रफुल पटेल यांची नियुक्ती सर्वसंमतीने करण्यात आली आहे. या प्रक्रियेत अजित पवार यांनाही विश्वासात घेण्यात आले होते, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
पक्षामध्ये कार्यकारी अध्यक्ष नेमण्यासंदर्भात गेले दोन महिने चर्चा केली जात होती. त्यावर पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमावर शिक्कामोर्तब करण्यात आले. सुळे व पटेल यांच्याकडे ही जबाबदारी दिली पाहिजे, अशी मागणी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी केली होती. त्यांच्याशी सल्ला-मसलत केल्यानंतरच हा निर्णय घेण्यात आला आहे, असे सांगत अजित पवार नाराज असल्याची बाब पवारांनी फेटाळली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी जयंत पाटील यांच्याकडे आहे. अजित पवार विधानसभेतील विरोधी पक्षनेते आहेत. या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांकडे महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आगामी चार राज्यांतील विधानसभा निवडणुका व लोकसभा निवडणुकीमध्ये पक्षाच्या विस्ताराच्या कामाच्या विभाजनासाठी सुप्रिया सुळे व प्रफुल पटेल यांच्याकडे नवी जबाबदारी देण्यात आली आहे, असे पवार म्हणाले. भाजपेतर विरोधी पक्षांनी एकत्र आले पाहिजे. त्यासाठी या पक्षांनी स्वत:लाही मजबूत करण्याची गरज आहे. त्यामुळे पक्षाच्या विस्ताराची जबाबदारी फक्त एका नेत्यावर न सोपवता प्रत्येक नेत्याकडे ४-५ राज्ये वाटून दिली गेली आहेत, असे पवार म्हणाले.
कार्यक्रमाला नेत्यांची उपस्थिती
दिल्लीतील वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाला पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, अजित पवार, जितेंद्र आव्हाड, सुनील तटकरे, वंदना चव्हाण, फौजिया खान आदी नेते उपस्थित होते. या सर्व नेत्यांनी सुळे व पटेलांच्या नियुक्तीचे स्वागत केले असून नवी जबाबदारी सांभाळण्यासाठी हे दोन्ही नेते योग्य असल्याची प्रतिक्रिया या नेत्यांनी दिली.
सुप्रिया सुळे व प्रफुल पटेल यांची नियुक्ती सर्वसंमतीने करण्यात आली आहे. या प्रक्रियेत अजित पवार यांनाही विश्वासात घेण्यात आले होते.