सागर कासार, पुणे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात आकर्षित होत असून त्यांच्या सभांमुळे नवा पायंडा पडला आहे. ही चांगली बाब असून या निवडणुकीत या सभांचा फायदा आघाडीला निश्चितच होईल, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले आहे.

धनंजय मुंडे यांनी गुरुवारी लोकसत्ता.कॉमला मुलाखत दिली असून या मुलाखतीमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर टीकेची झोड उठवली. मोदींच्या मुलाखतीबाबत मुंडे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी अक्षय कुमारच्या मुलाखतीमध्ये सांगितले की मी आज देखील आईला भेटण्यास जातो, तेव्हा माझी आई मला सव्वा रुपया देते. हे ऐकून मला आश्चर्य वाटले. कारण सव्वा रुपयामधील पंचवीस पैशांचा शोध घेतला असता ते काही सापडले नाही. त्यामुळे अगोदर देशाच्या जनतेला अनेक आश्वसन देऊन फसवले आणि आता ही मुलाखत देऊन फसवत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एवढा आजवर खोटारडा माणूस मी पाहिला नाही, अशी टीका त्यांनी केली.

देशभरात निवडणूकीच्या प्रचाराला सुरुवात झाली असून काही ठिकाणी मतदान देखील झाले आहे. या मतदानाच्या दरम्यान प्रत्येक राजकीय नेत्याकडून महाराष्ट्रात सभा घेतल्या जात आहे. मात्र त्यामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राज्यात आल्यावर शरद पवार यांच्यावर टीका करतात. हे पाहून वाईट वाटते. कारण शरद पवार यांच्या ५५ वर्षाच्या राजकीय प्रवासात देशाला एक दिशा देण्याचे काम केले आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्यावर टीका करतात हे योग्य नाही.पंतप्रधानपदाची गनिमा पाळण्याची गरज होती, असे मुंडेंनी सांगितले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांचा आघाडीला कितपत फायदा होईल, असा प्रश्नही मुंडेंना विचारला. यावर ते म्हणाले की, राज ठाकरे यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर तरुण वर्ग आकर्षित असून यंदा त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून सत्ताधारी भाजपचा भांडाफोड केला. या अशा सभाचा नवा पायंडा त्यांच्याकडून पडला गेला आहे. ही चांगली बाब असून या निवडणुकीत आघाडीला निश्चित फायदा निश्चित होईल. असे त्यांनी सांगितले.