भारतातील लहान मुलांच्या मानसिक आरोग्याबाबत धक्कादायक माहिती समोर आलीय. सरकारी आकडेवारीनुसारच २०२० मध्ये दरदिवशी तब्बल ३१ चिमुरड्यांनी आत्महत्या केलीय. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी अहवालातील (NCRB report) आकडेवारीतून ही बाब समोर आलीय. असं का झालं याबाबत तज्ज्ञांनी अनेक अंदाज वर्तवले आहेत. यापैकी काही जणांच्या मते करोना साथीरोगाच्या काळात लहान मुलांचा वाढलेला ताण हे यामागे कारण आहे.

एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार, २०२० मध्ये तब्बल ११ हजार ३९६ मुलांनी आत्महत्या केल्यात. २०१९ मध्ये हीच संख्या ९ हजार ६१३ आणि २०१८ मध्ये ९ हजार ४१३ इतकी होती. २०२० मध्ये मुलांच्या आत्महत्येचं प्रमाण २०१९ च्या तुलनेत १८ टक्क्यांनी आणि २०१८ च्या तुलनेत २१ टक्क्यांनी वाढलं आहे.

मुलांच्या आत्महत्यांची कारणं काय?

मुलांच्या आत्महत्येमागील कारणांपैकी प्रमुख कारण कौटुंबिक प्रश्न असल्याचं समोर आलंय. या कारणामुळे ४,००६ मुलांनी आत्महत्या केल्यात. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर प्रेम प्रकरणातून आत्महत्या हे कारण आहे. यामुळे १,३३७ मुलांनी आत्महत्या केल्या. तिसऱ्या क्रमांकावर आजारपणाला कंटाळून आत्महत्या हे कारण आहे. यामुळे १,३२७ मुलांनी आत्महत्या केलीय. याशिवाय वैचारिक मतभेद, एखाद्याला नायक समजून आहारी जाणं, बेरोजगारी, कर्जात बुडणे, नपुंसकत्व किंवा वंध्यत्व आणि ड्रग्जच्या व्यसनातून शोषण अशा कारणांचाही समावेश एनसीआरबीच्या या अहवालात करण्यात आलाय.

हेही वाचा : एसटी कर्मचाऱ्याने एसटीला लटकून घेतला गळफास; दिवाळीच्या तोंडावरच अहमदनगरमध्ये धक्कादायक घटना

२४ तास पालकांसमोर घरातच राहिल्यानं ताण वाढला

काही जाणकारांनी करोनाच्या पार्श्वभूमीवर बंद शाळा महाविद्यालयं आणि २४ तास मुलं घरातच पालकांसमोर असल्यानं तयार झालेला ताण हेही कारण असल्याचं म्हटलं आहे. या काळात मुलांचं मित्रांसोबत बोलणं न होणं, शिक्षकांशी संपर्क न होणं, समाजापासून तुटल्यानं हा ताण तयार झाल्याचं त्यांनी म्हटलं.