देशातील विविध राज्यांतील पोटनिवडणुकांचे निकाल मंगळवारी जाहीर झाले. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी विविध राज्यांमध्ये पक्षाच्या विजयाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार सर्वसामान्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सतत कटिबद्ध असल्याचे त्यांनी ट्विट केले आहे. निवडणुकीतील विजयानंतर नड्डा यांनी कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आहे.

ट्विटरवर नड्डा म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकार अंत्योदयाचा मूळ मंत्र घेऊन सर्वसामान्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कटिबद्ध आहे. मी कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो आणि लोकसभा आणि विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपा आणि एनडीएच्या विजयाबद्दल लोकांचे आभार मानतो,” असे ट्विट नड्डा यांनी केले.

आसाममध्ये मंगळवारी भाजपाच्या नेतृत्वाखालील आघाडीने पाचही जागांवर पोटनिवडणूक जिंकली. मध्य प्रदेशात भाजपाने तीनपैकी दोन विधानसभा मतदारसंघ आणि खांडवा लोकसभा मतदारसंघात विजय मिळवला. बिहारमध्ये, जनता दल युनायटेडने तारापूर आणि कुशेश्वर अस्थान विधानसभेच्या दोन्ही जागा जिंकल्या. कर्नाटकमध्ये भाजपाने सिंदगी विधानसभा पोटनिवडणुकीत विजय मिळवला आहे, तर हंगल मतदारसंघात भाजपाला हरवून काँग्रेसने विजय मिळवला.

हिमाचल प्रदेशमध्ये ३० ऑक्टोबर रोजी झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेस पक्षाने विधानसभेच्या तीन जागा जिंकल्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला. काँग्रेसने मंडी लोकसभा मतदारसंघही जिंकला. त्याचप्रमाणे, काँग्रेसने राजस्थान पोटनिवडणुकीत बाजी मारली असून पोटनिवडणुकीत झालेल्या धारियावाड आणि वल्लभनगर विधानसभा जागा जिंकल्या आहेत.