सोमवारी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंध्र प्रधान यांनी पदवी प्रवेशासाठीची NEET प्रवेश परीक्षा या वर्षी १२ सप्टेंबर रोजी घेतली जाणार असल्याचं जाहीर केल्यानंतर आज केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी एमडी, एमएस किंवा पदव्युत्तर पदविका अर्थात पीजी डिप्लोमा अशा अभ्यासक्रमांसाठी घेतली जाणारी NEET PG परीक्षा ११ सप्टेंबरला घेतली जाणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे या परीक्षांची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांचा जीव भांड्यात पडला आहे. गेल्या वर्षभरापासून देशात करोनामुळे निर्माण झालेल्या अभूतपूर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सर्वच परीक्षांचं भवितव्य अधांतरी झालेलं असताना केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी केलेल्या या घोषणेमुळे वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे.

 

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सोमवारी NEET UG अर्थात पदवी प्रवेशासाठीची परीक्षा १२ सप्टेंबर रोजी होणार असल्याचं जाहीर केलं. आजपासून अर्थात १३ जुलै रोजी संध्याकाळी ५ वाजेपासून या परीक्षेचे अर्ज देखील संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यानंतर आता NEET PG ची देखील घोषणा करण्यात आली आहे.

दरम्यान, ऑफलाईन होणाऱ्या या परीक्षा नेमक्या कशा पद्धतीने घेतल्या जाणार, त्यांचा पॅटर्न काय असेल यासंदर्भात लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षी करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्रावर सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्यात आले. वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय पदवी प्रवेशासाठी घेण्यात येणारी राष्ट्रीय प्रवेश परीक्षा (नीट) देशभरातील ३ हजार ८४२ परीक्षा केंद्रावर घेण्यात आली. या परीक्षेसाठी १५ लाख ९७ हजार ४३३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील ८५ ते ९० टक्के विद्यार्थी परीक्षेला उपस्थित होते. राज्यातील २ लाख २८ हजार ९१४ नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची ६१५ केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली.