भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजे ‘ट्राय’ने सोमवारी इंटरनेट सेवांसाठी वेगवेगळे दर आकारण्याच्या विरोधात कौल देत नेट न्युट्रॅलिटीवर शिक्कामोर्तब केले. ट्रायच्या या निर्णयामुळे फेसबुकच्या ‘फ्री बेसिक सेवा’ योजनेला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे कोणत्याही सेवा पुरवठादार इंटरनेटसाठी वेगवेगळे दर आकारले जाण्याची शक्यता निकालात निघाली आहे. सेवा पुरवठादार केवळ आपातकालीन परिस्थितीच इंटरनेटचे दर कमी करू शकतात, असे ट्रायने म्हटले आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या इंटरनेट पुरवठाराला प्रतिदिवशी ५० हजारांचा दंड आकारण्यात येईल, असेही ट्रायने म्हटले आहे. काही टेलिकॉम कंपन्या ग्राहकांना इंटरनेटच्या खास ऑफर देतात. मात्र, ट्रायने यावरही बंदी आणली आहे. काही दिवसांपूर्वी फेसबुकडून विकसनशील देशांसाठी ‘इंटरनेट डॉट ओआरजी’ सेवेची घोषणा करण्यात आली होती. यामध्ये काही संकेतस्थळांना इंटरनेटचे पैसे न मोजताही भेट देणे शक्य होणार होते.