Dr Kruthika Reddy Murder Case: बंगळुरूमधील डॉ. कृतिका एम रेड्डी (२८) हत्या प्रकरणाने देशभरात खळबळ उडाली. ३१ वर्षीय डॉक्टर महेंद्र रेड्डी यांनीच पत्नी कृतिका रेड्डीला भुल देण्याच्या औषधाची जादा मात्रा देऊन मारले, असा आरोप कृतिका यांच्या कुटुंबियांच्या वतीने करण्यात आला. या आरोपाखाली डॉ. महेंद्र रेड्डीला मणिपाल येथून अटक करण्यात आली. सध्या त्याला नऊ दिवसांची पोलीस कोठडी मिळाली असून त्याची पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे.

डॉ. महेंद्र रेड्डीने भुल देण्याचे औषध कसे मिळवले, त्याचा हेतू काय होता? यावर पोलिसांनी लक्ष केंद्रीत केले आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, महेंद्रने त्याच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच त्याने पत्नी डॉ. कृतिकाला कोणतेही औषध दिले नाही, असे सांगितले. पोलीस या प्रकरणाची अधिक चौकशी करत आहेत.

पोलिसांनी गुरूवारी त्याच्या गुंजूर येथील निवासस्थानाची झडती घेतली. तिथून लॅपटॉप, मोबाइल फोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आली. या उपकरणांची तपासणी करण्यासाठी त्यांना फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे.

डॉ. कृतिकाच्या मृत्यूनंतर सहा महिन्यांनी कृतिकाची बहीण निकीताला मृत्यूचे कारण शोधण्यात यश आले. फॉरेन्सिक अवहालात असे आढळून आले की, तिला प्रोपोफोल या औषधाची जादा मात्रा देण्यात आली होती. हे औषध रुग्णालयात शस्त्रक्रियेपूर्वी भूल देण्यासाठी वापरले जाते. डॉ. महेंद्र रेड्डी हे सर्जन असल्यामुळे त्यांच्याकडे सर्वात प्रथम संशयाची सुई गेली. ज्यामुळे हे प्रकरण अनैसर्गिक मृत्यूच्या प्रकरणातून खूनाच्या चौकशीत बदलले, असे पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

दुसऱ्या महिलेचा तपासात उल्लेख

डॉ. महेंद्र रेड्डीचे दुसऱ्या एका महिलेशी जवळीक असल्याची माहिती या प्रकरणात समोर आली आहे. या अफवांचाही तपास आता पोलीस अधिकारी करत आहेत. तसेच डॉ. कृतिका यांना गॅस्ट्रोइंटेस्टाइनल हा आजार होता, असे महेंद्रने सांगितले होते. या दाव्याचीही आता पडताळणी केली जात आहे. गॅस्ट्रोचा आजार हा फार मोठा आजार नाही, त्यामुळे डॉ. महेंद्र काहीतरी लपवत आहेत, अशी शंका आम्हाला वाटते, असेही पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

लग्नाच्या दोनच महिन्यांनंतर २४ एप्रिल रोजी कृतिकाचा मृत्यू झाला होता. नंतर तिच्या कुटुंबियांनी महेंद्रवर उपचाराच्या बहाण्याने तिचा खून केल्याचा आरोप केला.