Mohan Bhagwat on 75 Year Rule: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला १०० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्त “संघाच्या प्रवासाची १०० वर्षे – न्यू होरायझन्स” या तीन दिवसांच्या शताब्दी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेच्या निमित्तानं आयोजित पत्रकार परिषदेत बोलत असताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज विविध विषयांवर भाष्य केलं. राजकीय आणि सामाजिक विषयांवर बोलत असतानाच त्यांनी भाजपा आणि संघाच्या संबंधांवरही प्रकाश टाकला. तसेच एखाद्या नेत्याला ७५ वर्ष पूर्ण होताच निवृत्ती घ्यावी, अशा विधानावरून निर्माण झालेल्या उलटसुलट चर्चांनाही त्यांनी उत्तर दिलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा १७ सप्टेंबर रोजी ७५ वा वाढदिवस येत आहे. भाजपामधील एका अघोषित नियमाची चर्चा नेहमी होते. ७५ वर्ष पूर्ण करणाऱ्या नेत्यांना बाजूला सारून नव्या नेतृत्वाला संधी दिली जाते. यासाठी काही जुन्या नेत्यांना मार्गदर्शक मंडळात बसवल्याचा दाखला दिला जातो. मोहन भागवत यांनी काही दिवसांपूर्वी एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात बोलत असताना पंच्याहत्तरीच्या निमित्ताने केलेल एक विधान पंतप्रधान मोदींच्या निवृत्तीशी जोडले गेले होते. त्यावर आता भागवत यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
७५ व्या वर्षी निवृत्ती घ्यावी, असं म्हणालो नाही
मोहन भागवत हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहा दिवस आधी (११ सप्टेंबर) ७५ वर्षांचे होणार आहेत. आजच्या व्याख्यानमालेत बोलत असताना ते म्हणाले, मी कधीही असे म्हटले नव्हते की, मी निवृत्त होईन किंवा दुसऱ्या कुणी ७५ वर्षांचे झाल्यानंतर निवृत्त व्हावे. संघ जे सांगेल ते आम्ही करू. कोणतेही काम नाकारण्यासाठी आम्ही वयाचे कारण देऊ शकत नाही.
मोहन भागवत पुढे म्हणाले, “संघात काम करत असताना आम्हाला विशिष्ट जबाबदारी सोपवली जाते. ती आम्हाला हवी की नको, याचा संबंधच नसतो. मी जरी ८० वर्षांचा असलो आणि संघाने सांगितले की, जा जाऊन शाखा चालवा तरी मला ते करावे लागेल. संघ जे सांगेल ते आम्ही करत असतो.”
मोहन भागवत निवृत्तीबाबत काय म्हणाले होते?
जुलै महिन्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक असलेले मोरोपंत पिंगळे यांच्या आयुष्यावरच्या पुस्तकाचे प्रकाशन करत असताना मोहन भागवत यांनी पंचहात्तरीची शाल अंगावर पडली की ती वेळ थांबायची असते असे विधान केले होते. या विधानामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या होत्या.
पिंगळे यांच्या एका संवादाचा दाखला देताना भागवत म्हणाले होते, “मोरोपंत पिंगळे एकदा म्हणाले की जेव्हा पंचाहत्तरीची शाल अंगावर पडते त्याचा अर्थ आता थांबावं, तुमचं वय झालं आहे; बाजूला सरा, आम्हाला काम करु द्या” ही आठवण मोहन भागवत यांनी आपल्या भाषणात सांगितली होती.
भाजपा आणि संघ यांच्यात समन्वय
भाजपा आणि संघाच्या समन्वयाबद्दल बोलताना मोहन भागवत म्हणाले, मला शाखा चालविण्याचा अनुभव आहे आणि भाजपा सरकार चालविण्यात कुशल आहे. आम्ही एकमेकांना केवळ सल्ला देऊ शकतो. आमचे कुठेही भांडण नाही, पण सर्व मुद्द्यांवर एकमत होणे शक्य नाही; आम्ही नेहमीच एकमेकांवर विश्वास ठेवतो.
मोहन भागवत पुढे म्हणाले, “आमचा प्रत्येक सरकारशी, राज्य सरकारांशी आणि केंद्र सरकारशी चांगला समन्वय आहे. परंतु अशा काही व्यवस्था आहेत ज्यात काही अंतर्गत विरोधाभास आहेत. सर्वसाधारणपणे व्यवस्था तीच आहे, जी ब्रिटिशांनी राज्य करण्यासाठी शोधून काढली होती. म्हणून, आपल्याला काही नवीन उपक्रम करावे लागतील.”