Donald Trump Comments On Chinese Officials: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात नुकतीच द्विपक्षीय बैठक झाली. यानंतर काल (बुधवारी) व्हाईट हाऊसमधील रिपब्लिकन पक्षाच्या सिनेटर्सबरोबर झालेल्या बैठकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी शी जिनपिंग आणि त्यांच्या अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या द्विपक्षीय बैठकीवर भाष्य केले.
या बैठकीचे वर्णन करताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, शी जिनपिंग यांच्या दोन्ही बाजूंना सहा अधिकारी होते आणि ते सर्व सरळ उभे होते. त्यांचे हात पाठीमागे आणि चेहरा समोर होता.
जेव्हा डोनाल्ड ट्रम्प त्यांच्यापैकी एकाशी बोलले, तेव्हा त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. “मी म्हणालो, ‘तुम्ही मला उत्तर देणार आहात का?’ मला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. शी जिनपिंग यांनी त्यांना काहीही बोलू दिले नाही. माझ्या मंत्रिमंडळानेही असेच वागावे असे मला वाटते”, असे ट्रम्प यांनी सांगितले.
यावेळी, “मी माझ्या आयुष्यात कधीही इतके भित्रे लोक पाहिले नाहीत”, असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले तेव्हा सभागृहात हशा पिकल्याचे पाहायला मिळाले.
“तुम्ही असे का वागत नाही? जेडी असे वागत नाही. ते लगेच संभाषणात सुरू करतात. किमान काही दिवस तरी असे वागा, ठीक आहे, जेडी?” असे डोनाल्ड ट्रम्प उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांना म्हणाले. त्यानंतर व्हान्स यांनीही सरळ बसल्याचे नाटक केले आणि पुन्हा एकदा सभागृहात हशा पिकला.
दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्रिमंडळाच्या बैठका देखील लाळघोटेपणाचा एक प्रकार आहेत, असा आरोप केला जातो. ऑगस्टमध्ये टेलिव्हिजनवर प्रसारित झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये, सरकारी बैठकीपेक्षा ट्रम्प यांचे कोण जास्त कौतुक करते याची स्पर्धा अधिक दिसून आली.
एकेकाळी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे प्रेस सेक्रेटरी म्हणून काम केलेल्या जेन साकी यांनी या बैठकीचे वर्णन “लाळघोटेपण” असे केले होते. त्यांनी म्हटले होते की, “ट्रम्प यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लाळघोटेपणापुढे उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन किंवा रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यासारखे नेतेही लाजतील.”
डोनाल्ड ट्रम्प आणि शी जिनपिंग यांची गेल्या महिन्यात बुसान येथे ३२ व्या अपेक परिषदेदरम्यान द्विपक्षीय बैठक झाली होती. त्यावेळी ट्रम्प यांनी शी यांच्याशी वाटाघाटी करणे खूप कठीण असल्याचे म्हटले होते.
