करोनाच्या विळख्यातून जग सुटलंय असं वाटत असतानाच ब्रिटनमधून एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. ब्रिटनमध्ये पुन्हा एकदा करोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. संपूर्ण देशभरात लसीकरण झालेलं असतानाही करोनाच्या नव्या व्हेरिएंटने चिंता वाढवल्या आहेत. करोनाच्या या नवीन व्हेरिएंटला ईजी ५.१ असं नाव देण्यात आलं आहे. तसेच त्याला ईजी ५.१ एरिस असंही म्हटलं जात आहे. इंग्लंडमधील आरोग्य तज्ज्ञांनी सांगितलं की, हा व्हेरिएंट ओमिक्रॉनपासून आला आहे.

ब्रिटनमधील आरोग्य संरक्षण संस्थेने (यूकेएचएसए) म्हटलं आहे की, ब्रिटनमध्ये कोव्हिड-१९ च्या एका नवीन व्हेरिएंटचा झपाट्याने प्रसार होत आहे. ज्यामुळे देशातील आरोग्य अधिकाऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. कोरोनाच्या या नवीन व्हेरिएंटला एरिस (Eris) असं नाव देण्यात आलं आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर, विशेषत: आशियातील वाढत्या प्रादूर्भावामुळे यूकेमध्ये या व्हेरिएंटचा प्रसार झाल्याचं यूकेतल्या आरोग्य तज्ज्ञांचं म्हणणं आहे. ३१ जुलै रोजी या व्हेरिएंटची युकेत नोंद झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं आता याप्रकरणी तपास सुरू केला आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस यांनी सांगितलं की लसीकरणामुळे लोक आधीपेक्षा सुरक्षित आहेत. किंबहुना पूर्वी जशी परिस्थिती होती, तशी परिस्थिती आता नाही. परंतु, आपण सतर्क राहिलं पाहिजे.

हे ही वाचा >> मदतीसाठी आरडाओरड आणि किंकाळ्या; १२ वर्षीय मुलीसह कार पुलावरून कोसळली, थरकाप उडवणारा VIDEO

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यूकेएचएसएने जारी केलेल्या अहवालानुसार यूकेमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. अलिकडेच ४,३९६ लोकांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ३.७ टक्के लोक कोरोनाबाधित असल्याचं आढळलं आहे. तसेच दर सात कोरोनाबाधित रुग्णांपैकी एक रुग्ण हा कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने (एरिस) बाधित झाला असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.