न्यूयॉर्कच्या महापौरपदाच्या निवडणुकीत विजयी ठरलेल्या झोहरान ममदानी यांनी केलेल्या विजयी भाषणात भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी स्वातंत्र्यानंतर केलेल्या भाषणामधील संदर्भाचा उल्लेख केला. भ्रष्टाचाराचे निर्मूलन, समानतेकडे वाटचाल करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. त्यांच्या भाषणाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता.

ममदानी म्हणाले, ‘न्यूयॉर्कच्या नागरिकांनी अशक्यही शक्य होईल, अशी आशा ठेवल्याने आपण जिंकलो आहोत. आपल्याबरोबर राजकारण ज्या पद्धतीने केले जात आहे, तसे आता होणार नाही, याचा सातत्याने आग्रह आपण धरल्यामुळेही आपण विजयी झालो आहोत.’

न्यूयॉर्कमधील महापौरपदाची निवडणूक जिंकण्याबरोबरच डेमोक्रॅटिक पक्षाने गव्हर्नर पदासाठी व्हर्जिनिया आणि न्यू जर्सी येथे झालेल्या निवडणुकीतही बाजी मारली. ट्रम्प यांच्या अध्यक्षपदाच्या दुसऱ्या कारकिर्दीला तेथील जनतेचा पाठिंबा कमी झाल्याचे यामुळे बोलले जात आहे.

ममदानी यांनी त्यांच्या भाषणात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरही टीका केली. ट्रम्प यांनी ममदानी यांचा उल्लेख साम्यवादी म्हणून केला होता. ममदानी म्हणाले, ‘देशाचा विश्वासघात केलेल्या ट्रम्प यांचा पराभव कसा करायचा, हे कुणी दाखवून दिले असेल, तर ते हेच शहर आहे, की ज्या शहराने त्यांना मोठे केले. या हुकुमशहांमध्ये आणखी दहशत तयार करायची असेल, तर सत्तेचे केंद्रीकरण करण्यासाठीचे जे-जे म्हणून मार्ग आहेत, ते तोडावे लागतील. ट्रम्प यांना आपण कशा पद्धतीने थांबविले, हे आपण दाखविले नसून, त्यांच्यानंतर तसे कुणी येणार नाही, याची आपण काळजी घेतली आहे.’ ट्रम्प यांना उद्देशून ममदानी म्हणाले, ‘तुम्ही (माझे भाषण) पाहत आहात, हे मला माहिती आहे. माझ्याकडे तुमच्यासाठी चार शब्द आहेत, ‘आवाज थोडा आता वाढवा’.’

तुमच्यासमोर उभे राहिल्यानंतर मला जवाहरलाल नेहरू यांचे शब्द आठवतात. ‘इतिहासात असा क्षण क्वचितच येतो, जेव्हा आपण जुन्याकडून नव्याकडे पाऊल टाकतो. जेव्हा एका युगाचा अंत होतो आणि दीर्घ काळ दबावाखाली राहिलेल्या देशाचा आत्मा व्यक्त होतो.’ आज आपण जुन्यातून नव्याकडे पाऊल टाकले आहे. – झोहरान ममदानी, महापौर, न्यूयॉर्क

क्लिंटन, ओबामांकडून कौतुक

अमेरिकेचे माजी अध्यक्ष बिल क्लिंटन, बराक ओबामा यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या निवडणुकीतील यशाबद्दल अभिनंदन केले आहे. ममदानी यांचेही त्यांनी अभिनंदन केले आहे. याखेरीज, हिलरी क्लिंटन, माजी उपाध्यक्ष कमला हॅरिस यांनीही विजेत्यांचे अभिनंदन केले आहे.

‘न्यूयॉर्क हे स्थलांतरितांचे शहर’

ममदानी यांच्या न्यूयॉर्कमधील विजयाला मोठा राजकीय अर्थ आहे. अध्यक्ष ट्रम्प हे स्वत: न्यूयॉर्कचे रहिवासी आहेत. त्यांनी लोकशाही समाजवादी असलेल्या नेत्याला मत देऊ नका, असा इशारा सातत्याने दिला होता. ट्रम्प यांच्या स्थलांतरितांबाबतच्या धोरणांना ममदानी यांनी सातत्याने विरोध केला आहे. ते म्हणाले, ‘स्थलांतरितांच्या ऊर्जेमुळे न्यूयॉर्क सतत प्रगती करील राहील. तसेच, आता विजयानंतर न्यूयॉर्कचे नेतृत्व स्थलांतरित करील. न्यूयॉर्क हे स्थलांतरितांचे शहर राहील. या शहराची बांधणी स्थलांतरितांनी केली, ऊर्जा स्थलांतरितांनी दिली आणि आज या शहराला नेतृत्वही स्थलांतरित लाभले आहे.’

‘धूम मचा ले… धूम!’

मूळ भारतीय वंशाचे असलेल्या झोहरान ममदानी यांनी निवडणुकीच्या प्रचारात आणि निवडून आल्यानंतरही हिंदी चित्रपटांतील गाण्यांचा खूबीने वापर केला. निवडणुकी विजय मिळवल्यानंतर केलेल्या भाषणाच्या अखेरीस व्यासपीठावर २००४च्या ‘धूम’ चित्रपटातील ‘धूम मचा ले…’ हे गाणे वाजत होते. हे गाणे वाजत असताना ममदानी हात उंचावून अभिवादन करत असल्याची चित्रफीत समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाली. न्यूयॉर्कच्या भारतीय वंशाच्या मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रचाराच्या अनेक चित्रफितींमध्ये ममदानी यांनी हिंदी चित्रपटातील गाणी, संवादाचा वापर केला आहे. ‘दीवार’, ‘कर्ज’, ‘ओम् शांती ओम्’ या चित्रपटांतील गाणी, संवादाच्या चित्रफिती मतदारांमध्ये प्रसिद्ध झाल्या.

प्रवास प्रेरणादायी

● न्यूयॉर्क : एका लोकप्रतिनिधीपासून अमेरिकेतील सर्वांत मोठ्या शहराच्या महापौरपदापर्यंतचा जोहरान ममदानी यांचा प्रवास प्रेरणादायी आहे. विशेषत: भारतीय-अमेरिकी समुदायासाठी तो उल्लेखनीय आहे. ममदानी (वय ३४) हे भारतीय वंशाचे आहेत. त्यांनी अपक्ष उमेदवार अँड्र्यू कुओमो आणि रिपब्लिकन पक्षाचे कर्टिस स्लिवा यांचा महापौरपदाच्या निवडणुकीत पराभव केला.

● ते भारतीय वंशाचे पहिले, पहिले मुस्लिम, आफ्रिकेत जन्म झालेले पहिले आणि गेल्या शंभर वर्षांहून अधिक काळात न्यूयॉर्कचे महापौरपद भूषविलेल्यांमधील सर्वांत तरुण महापौर ठरणार आहेत. पुढील वर्षी १ जानेवारीपासून ते महापौरपदाची सूत्रे हाती घेतील. ‘मी तरुण आणि मुस्लिम आहे. मुस्लिम आहे म्हणून मी कुणासमोर मान झुकवली नाही,’ असे ते विजयी भाषणात म्हणाले.

● ममदानी हे भारतातील चित्रपटनिर्मात्या मीरा नायर आणि कोलंबिया विद्यापीठातील प्राध्यापक मेहमूद ममदानी यांचे पुत्र आहेत. ममदानी यांचा जन्म युगांडामधील कंपाला येथे झाले. तेथेच ते वाढले. वयाच्या सातव्या वर्षी कुटुंबीयांसह ते अमेरिकेत आले. ममदानी हे २०१८ मध्ये अमेरिकेचे अधिकृत नागरिक झाले. ममदानी यांनी ‘ब्राँक्स हाय स्कूल ऑफ सायन्स’ येथून शालेय शिक्षण घेतले आणि ‘बोवडिन कॉलेज’मधील ‘आफ्रिकाना स्टडीज’ येथून ते पदवीधर झाले. शाळेत असताना त्यांनी शाळेची पहिलीवहिली क्रिकेट टीमची स्थापना केली.

● कमी उत्पन्न गटातील नागरिकांच्या घरांची कर्जे थकल्यामुळे त्यांची मालमत्ता जप्त करण्यास प्रतिबंध करावा, यासाठी राबवीत असलेल्या उपक्रमात त्यांनी सल्लागार म्हणून त्यांनी काम केले आहे. २०२० मध्ये ते प्रथम विधानसभेत निवडून आले. अस्टोरिया, डिटमार्स भागाचे नेतृत्व त्यांनी केले.

● कमी उत्पन्न गटातील नागरिकांच्या घरांवरील कर्ज आणि वसुलीच्या समस्येवरून त्यांनी बँकांशी सातत्याने संवाद ठेवला. ही समस्या विशेषत: करोनाकाळानंतर तयार झाली होती. दीर्घ काळ कॉर्पोरेट जगाला फायदा व्हावा, यासाठी आखलेल्या धोरणांतून ही समस्या तयार झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. ही स्थिती बदलण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. न्यूयॉर्क विधानसभेत ते पहिले दक्षिण आशियायी नेते होते. तसेच, केवळ तिसरे मुस्लिम होते. ज्या समुदायाचे आवाज दडपले गेले, ज्यांना व्यक्त होता आले नाही, त्यांचा आवाज होण्याचे ममदानी यांचे स्वप्न आहे.

● न्यूयॉर्कमधील राहणीमानाचा खर्च कमी व्हावा, हे उद्दिष्ट ठेवून त्यांनी महापौरपदाची निवडणूक लढली.

डेमोक्रॅटिक पक्षाचे वर्चस्व

● डेमोक्रॅटिक पक्षाच्या अॅबिगेल स्पॅनबर्गर या व्हर्जिनियाच्या गव्हर्नर म्हणून निवडून आल्या आहेत. व्हर्जिनियाच्या त्या पहिल्या महिला गव्हर्नर असतील.

● डेमोक्रॅटिक पक्षाच्या आणि भारतीय वंशाच्या गझाला हाश्मी (वय ६१) व्हर्जिनियाच्या लेफ्टनंट गव्हर्नर म्हणून विजयी. उच्च पदावर राज्यातील पहिल्या मुस्लिम, दक्षिण आशियायी अमेरिकी नेत्या. रिपब्लिकन पक्षाच्या जोन रीड यांचा पराभव

● डेमोक्रॅटिक पक्षाच्या मिकी शेरगिल न्यू जर्सीच्या गव्हर्नर म्हणून विजयी.

● पेनसिल्व्हानिया येथे सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश पदासाठीच्या तीन निवडणुकांमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाची बाजी

● मेरी शेफील्ड या डेट्रॉइटच्या महापौर म्हणून विजयी. शहराचे प्रतिनिधित्व करणाऱ्या डेट्रॉइटच्या त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत.

● अँड्रे डिकन्स अटलांटाच्या महापौरपदी पुन्हा विजयी.

● डेमोक्रॅटिक पक्षाचे कोरी ओकॉनर पीट्सबर्ग येथून महापौरपदी विजयी

● भारतीय वंशाचे आफताब पुअरवल सिनसिनाटी, ओहायो येथून दुसऱ्यांदा विजयी. उपाध्यक्ष जे. डी. व्हेन्स यांच्या सावत्रभाऊ कोरी बाउमन यांचा पराभव.