man admits killing his parents eight years ago on live television interview Crime News : अपस्टेट न्यूयॉर्क येथे राहणाऱ्या एका ५३ वर्षीय व्यक्तीने टीव्हीवर लाईव्ह मुलाखतीदरम्यान आठ वर्षांपूर्वी आपण आपल्या आई-वडिलांची हत्या केल्याची आणि त्यांना त्यांच्या अल्बानी (Albany) येथील घरातील अंगणात पुरल्याचे कबूल केले. या धक्कादायक घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. असोसिएटेड प्रेसने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.

लोरेन्झ क्रॉउस नावाच्या व्यक्तीने गुरूवारी या भीषण कृत्याची कबुली दिली. याच्या एक दिवस आधी या व्यक्तीचे आई-वडील, फ्रान्झ आणि थेरेसिया क्रॉउस हे गायब असताना देखील त्यांचे सोशल सेक्युरिटी पेमेंट्स त्यांनी मिळणे सुरूच राहिल्याचा तपास करताना, त्यांच्या घरात दोन मृतदेह आढळल्याचे पोलिसांनी सांगितले होते.

जेव्हा क्रॉउस याला विचारण्यात आलं की, त्याच्या “आई-वडिलांना माहिती होतं का की हा त्यांचा शेवट आहे, ते तुझ्या हातून मरणार आहेत,” तेव्हा त्याने “होय” असे उत्तर दिले. तो पुढे म्हणाला: “आणि ते खूप लवकर झाले.”

क्रॉउसने त्याच्या पालकांचा मृत्यू हा ‘मर्सी किलिंग्स’ असल्याचे सांगितले. त्याचे पालक अधिकाधिक अशक्त होत चालले होते, असेही तो म्हणाला. “मी माझ्या पालकांप्रति माझे कर्तव्य बजावले. त्यांच्या दुर्दशेबद्दल माझी चिंता परमोच्च होती,” असे तो म्हणाल्याचे वृत्त एपीने दिले आहे.

क्राउस याला अल्बानी येथील सीबीएस६ स्टुडिओमधून बाहेर पडल्याबरोबर ताब्यात घेण्यात आले, त्याच्याविरोधात दोन हत्या केल्याचा खटला दाखल करण्यात आला आहे.

नेमकं काय झालं?

क्रॉउसने सांगितले की, त्याच्या आईला पडल्यामुळे दुखापत झाली होती आणि वडिलांच्या मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेनंतर ते गाडी चालवू शकत नव्हते. पण त्याने दोघांपैकी कोणालाही कसलाही असाध्य आजार असल्याबद्दल काहीही सांगितले नाही.

सीबीएस६ (CBS6)चे न्यूज डायरेक्टर स्टोन ग्रिसम यांनी सांगितले की, क्रॉउसने स्थानिक आउटलेट्सना आपला फोन नंबर असलेले दोन पानांचे निवेदन ईमेल केले होते. जेव्हा ग्रिसम यांनी त्याला फोन केला आणि विचारले की, त्याने त्याच्या आई-वडिलांची हत्या केली आहे का, तेव्हा क्रॉउस म्हणाला, “आय प्लीड द फिफ्थ.” एपीच्या रिपोर्टनुसार, क्रॉउस नंतर चॅनलच्या स्टेशनवर येण्यास तयार झाला आणि तो एका तासाच्या आत तेथे पोहोचला.

ग्रिसम यांनी पहिल्यांदा क्राउस याच्याकडे कुठलेही शस्त्र नसल्याची खात्री करून घेतली, या वेळी एक अधिकारी लॉबीमध्ये उपस्थित होता. मुलाखतीदरम्यान क्राउस याला “तू त्यांची हत्या केली का?” हा प्रश्न सतत्याने विचारण्यात आला. अखेर मुलाखत सुरू होऊन आठ मिनिटे झाली असताना क्राउस याने त्याच्या आई-वडिलांचा गळा दाबून हत्या केल्याचे कबूल केले.

पोलिसांनी सांगितले की, हा खटला सुरुवातीला आर्थिक फसवणुकीचा तपास म्हणून सुरू झाला होता. यामध्ये, क्रॉउसवर त्याच्या आई-वडिलांच्या सोशल सेक्युरिटी लाभांचा वापर केल्याचा आरोप होता.