Zohran Mamdani Targets PM Narendra Modi: “भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे युद्ध गुन्हेगार आहेत”, असं म्हणणाऱ्या झोहरान ममदानींनी पुन्हा एकदा मोदींना लक्ष्य केलं आहे. न्यूयॉर्कच्या मेयरपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार झोहरान ममदानी हे सध्या आघाडीवर आहेत. न्यूयॉर्कमधील मतदारांशी ते मोठ्या प्रमाणावर संवाद साधत आहेत. क्विन्स परिसरातील काही हिंदू मंदिरांना त्यांनी बुधवारी भेट दिली. यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. मोदी व भारतीय जनता पक्षाच्या धोरणात विशिष्ट गटातल्या भारतीयांनाच स्थान असल्याचं ते म्हणाले आहेत.
काय म्हणाले झोहरान ममदानी?
झोहरान ममदानी यांनी मोदींवर टीका करताना त्यांच्या धोरणाचा व भाजपाच्या राजकारणाचा उल्लेख केला. “मी नरेंद्र मोदी यांचा टीकाकार राहिलो आहे. त्यांच्या धोरणांवर मी टीका केली आहे. कारण मी अशा भारतात लहानाचा मोठा झालो, जो विविधतेनं नटलेला होता. असा भारत, जिथे सगळेच सुखाने नांदत होते. मग त्यांचा धर्म कोणता आहे यानं काही फरक पडत नाही”, अशा शब्दांत ममदानी यांनी मोदींना लक्ष्य केलं. शिवाय, विविधतेच्या भूमिकेचा त्यांनी पुनरुच्चारदेखील केला.
“नरेंद्र मोदी व त्यांचा भारतीय जनता पक्ष यांच्या भूमिकेला माझा विरोध आहे. त्यांच्या भूमिका वा धोरणांमध्ये फक्त विशिष्ट गटातल्या भारतीयांनाच स्थान आहे. विविधतेचा पुरस्कार करणे, त्याची कायम अपेक्षा ठेवणे या विश्वासातून माझा मोदींबद्दलचा हा विरोध आला आहे”, असंही ममदानी म्हणाले. ‘क्विन्स’मधील हिंदू समुदायासमोर ते बोलत होते.
मी मोदी समर्थकांचंही प्रतिनिधित्व करेन – ममदानी
दरम्यान, झोहरान ममदानी यावेळी मोदी समर्थकांचा आपण दुस्वास करणार नाही, असंही म्हटलं. “मला माहिती आहे की मी न्यूयॉर्कच्या मेयरपदाच्या निवडणुकीत उभा आहे. न्यूयॉर्कमधल्या जवळपास ८५ लाख नागरिकांपैकी अनेकजण असे आहेत, ज्यांचं मोदींबद्दलचं मत माझ्यापेक्षा वेगळं आहे. पण तो त्यांचा अधिकार आहे. त्यामुळे मी त्यांचंही प्रतिनिधित्न करेन. कारण न्यूयॉर्कमधील नागरिक म्हणून त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी घेणं हे माझं काम आहे”, असं झोहरान ममदानी म्हणाले.
याआधीही केली होती मोदींवर टीका
ममदानी यांनी याआधीही मोदींवर गुजरात दंगलींवरून टीका केली होती. “गुजरातमधून मुस्लिमांना हद्दपार करून टाकण्या आलं. लोकांना माहितीही नव्हतं की आम्ही कधीकाळी अस्तित्वात होतो”, असं विधान ममदानी यांनी केलं होतं. उमेदवारांच्या एका चर्चेदरम्यान ममदानी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी व इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यातील साधर्म्याबाबत विचारणा केली असता त्यांनी दोघांचाही उल्लेख ‘युद्ध गुन्हेगार’ असा केल्यानंतर खळबळ उडाली होती. त्यांच्या या विधानावर भारताच्या राजकीय वर्तुळातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता.