NIA arrests CRPF personnel Suspected of spying for Pakistan : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) केंद्रीय राखीव पोलीस दलातील (सीआरपीएफ) सहाय्यक उपनिरीक्षक (एएसआय) मोती राम जाट यांना हेरगिरीच्या आरोपांखाली अटक केली आहे. दरम्यान, आता मोती राम जाट यांच्याबद्दल आणखी काही माहिती समोर आली आहे. पहलागममध्ये दहशतवादी हल्ला होण्याच्या एक आठवडा आधी ते पहलगाममध्येच तैनात होते. हल्ल्याच्या सहा दिवस आधी त्यांची बदली करण्यात आली होती.
सीआरपीएफ जवान मोती राम जाट यांच्यावर आरोप आहे की ते ऑक्टोबर २०२३ पासून पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होते, सुरक्षेसंबंधीची महत्त्वाची व गुप्त माहिती ते पाकिस्तानला देत होते. मोती राम सीआरपीएफच्या ११६ व्या बटालियनमध्ये कार्यरत होते. एनआयएच्या तपासांत समोर आलं आहे की मोती राम वेगवेगळ्या माध्यमातून पाकिस्तानी अधिकाऱ्यांकडून पैसे घेत होते. दरम्यान, न्यायालयाने मोती राम यांना ६ जूनपर्यंत कोठडी सुनावली आहे, जेणेकरून या प्रकरणाची अधिक खोलात जाऊन चौकशी करता येईल, पुरावे गोळा करता येतील.
भारतीय सैन्याच्या हालचालींबद्दल पाकिस्तानला माहिती दिल्याचा संशय
आतापर्यंतच्या तपासांत एनआयएला आढळलं आहे की सीआरपीएफ जवान मोती राम जाट भारतीय सुरक्षाबलाच्या संचालन योजना, सुरक्षाबलाचे मार्ग, त्यांच्या हालचाली, सैन्य तळं आणि इतर महत्त्वाची माहिती पाकिस्तानी अधिकाऱ्यांना देत होते. एनआयएला संशय आहे की दहशतवाद्यांनी पहलगाम हल्ल्यावेळी मोती राम जाट यांनी दिलेल्या माहितीचा वापर केला असावा.
एनआयएला मोठ्या हेरगिरी रॅकेटचा संशय
मोती राम जाट यांना एनआयएने दिल्लीत अटक केल्यानंतर त्यांना सीआरपीएफने ताबडतोब नोकरीवरून काढून टालं आहे. मोती राम एखाद्या मोठ्या हेरगिरी रॅकेटचा भाग असल्याचा एनआयएला संशय आहे. त्यादृष्टीने त्यांनी तपास सुरू केला असून मोती राम यांची चौकशी चालू आहे.
आतापर्यंत १२ संशयित हेरांना अटक
२२ एप्रिल रोजी काश्मीरच्या पहलगाममधील बैसरन येथे चार दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला होता. या हल्लयात २६ पर्यटक ठार झाले. या हल्ल्यानंतर भारतातील सर्व प्रमुख तपास यंत्रणांनी पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपांतर्गत आतापर्यंत १२ जणांना ताब्यात घेतलं आहे. पंजाब, हरियाणा व उत्तर प्रदेशमध्ये या कारवाया करण्यात आल्या आहेत.