पीटीआय, बंगळुरू : कर्नाटकमधील काँग्रेस सरकारने शनिवारी मंत्रिमंडळात २४ मंत्र्यांचा समावेश करून विस्तार केला. या २४ मंत्र्यांमध्ये नऊ नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली असून, लक्ष्मी हेब्बाळकर या एकमेव महिला मंत्री आहेत. गेल्या आठवडय़ात मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यासह आठ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. नव्या २४ जणांच्या समावेशाने कर्नाटक मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या ३४ झाली आहे. राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी २४ मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यात बी. नागेंद्र, मधु बंगारप्पा, लक्ष्मी हेब्बाळकर, एम. एस. वैद्य, डॉ. एम. सी. सुधाकर, के. एन. राजन्ना, एन. एस. बोसेराजू, सुरेश बी. एस. आणि के. व्यंकटेश यांची प्रथमच मंत्रिपदी वर्णी लागली आहे. या २४ पैकी २३ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, विधानसभा किंवा विधानपरिषद या दोन्ही सभागृहांचे सदस्य नसलेल्या एन. एस. बोसेराजू यांची मंत्रिपदासाठी निवड करून पक्षश्रेष्ठींनी आश्चर्याचा धक्का दिला. ज्येष्ठ नेते एच. के. पाटील यांनाही मंत्रिपद देण्यात आले आहे. बोसेरोजू हे रायचूरचे असून, सध्या अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सचिव आहेत. निष्ठावान काँग्रेस कार्यकर्ते अशी त्यांची ओळख आहे. कालच त्यांचे नाव पक्षश्रेष्ठींनी निश्चित केल्याचे एका काँग्रेस नेत्याने सांगितले. रूपकला शशिधर, कनीज फातिमा आणि लक्ष्मी हेब्बाळकर या तीन महिला आमदार असल्या तरी पक्षाने हेब्बाळकरांनाच मंत्रिमंडळात स्थान देण्याचा निर्णय घेतला. आमदार एच. के. पाटील, कृष्णा बायरेगौडा, एन. चेलुवरायस्वामी, के व्यंकटेश, एच. सी. महादेवप्पा, कर्नाटक काँग्रेसचे कार्याध्यक्ष ईश्वर खांद्रे , प्रदेश काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष दिनेश गुंडू राव, क्याथसंद्र एन राजन्ना, शरणबसप्पा दर्शनापूर, शिवानंद पाटील, रामाप्पा बाळाप्पा तिम्मापूर, एस. एस. मल्लिकार्जुन, शिवराज संगप्पा तंगडगी, शरणप्रकाश रुद्रप्पा पाटील, एम. एस. वैद्य, लक्ष्मी हेब्बाळकर, रहिम खान, डी सुधाकर, संतोष लाड, एन एस बोसेराजू, सुरेश बी एस, मधु बंगारप्पा, एम सी सुधाकर आणि बी. नागेंद्र यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. चार वेळा आमदारपदी निवडून आलेल्या व सिद्धरामय्यांच्या मागील सरकारमध्ये मंत्रिपद भूषवणाऱ्या एम कृष्णप्पांना यावेळी मंत्रिपद देण्यात आले नाही. त्यांच्या समर्थकांनी शपथविधी समारंभात घोषणाबाजी केली. ‘समतोल राखण्याचा प्रयत्न’ मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी वरिष्ठ आणि कनिष्ठ आमदारांचा योग्य सन्मान राखत जात आणि प्रदेशनिहाय प्रतिनिधित्व देऊन मंत्रिमंडळात समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे. मंत्रिमंडळात आठ लिंगायत समाजाचे प्रतिनिधी असतील. शिवकुमार यांच्यासह पाच वोक्कलिगा समाजाचे प्रतिनिधी आहेत. नऊ अनुसूचित जातीच्या मंत्र्यांचाही समावेश करण्यात आला आहे.