काँग्रेसच्या मोदींवरील टीकेनंतर नितीन गडकरी यांचे स्पष्टीकरण

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवी दिल्ली : लस तुटवड्यामुळे लसीकरण मोहिमेवर विपरीत परिणाम झाल्याच्या पार्श्वभूमीवर अधिकाधिक लस उत्पादकांना परवाना देण्याच्या केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांच्या सूचनेच्या अनुषंगाने काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केल्यानंतर गडकरी यांनी बुधवारी त्यांच्या ‘त्या’ वक्तव्याबद्दल स्पष्टीकरण केले.

लशींचे उत्पादन वाढवण्यासाठी केंद्र सरकारने आधीच उपाययोजना केल्या आहेत, त्याची आपल्याला माहिती नव्हती, असे स्पष्टीकरण देत गडकरी यांनी ट्विटरद्वारे भूमिका स्पष्ट केली. ‘‘स्वदेशी जागरण मंचाच्या मंगळवारच्या कार्यक्रमात मी लशींचे उत्पादन वाढवण्यासाठी पर्यायी उपाय सुचवले होते, पण माझे भाषण होण्यापूर्वी केंद्रीय राज्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी, या संदर्भात केंद्र सरकार कोणती पावले उचलत आहे, याची माहिती दिली होती, परंतु मला त्याची माहिती नव्हती, असे गडकरी यांनी म्हटले आहे.

लशींच्या पुरवठ्यापेक्षा मागणी अधिक असेल तर समस्या निर्माण होणारच. एकाऐवजी दहा उत्पादक कंपन्यांना लसनिर्मितीचा परवाना दिला जाऊ  शकतो आणि समस्येवर मात करता येऊ  शकते, असे गडकरी म्हणाले होते.

गडकरींच्या वक्तव्याचा आधार घेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारला लक्ष्य केले. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मोदी यांना लिहिलेल्या पत्रात हीच सूचना केली होती. केंद्रीय मंत्रिमडळातील प्रमुखांना (मोदी)गडकरींच्या सूचना ऐकू जात आहेत का, अशी टीका रमेश यांनी केली होती. त्यानंतर गडकरी यांनी बुधवारी या संदर्भात ट्वीट करून स्पष्टीकरण दिले.

कार्यक्रम संपल्यानंतर मंत्री मंडाविया यांनी केंद्र सरकारने याआधीच घेतलेल्या निर्णयाची माहिती मला दिली. लशींच्या उत्पादनासाठी केंद्र सरकारने १२ उत्पादन कंपन्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पावले उचलली आहेत. या उपाययोजनांमुळे लवकरच लशींचे उत्पादन वाढू शकेल, असे रासायनिक व खते मंत्रालयातील राज्यमंत्री मंडाविया यांनी मला सांगितले.

केंद्राच्या या प्रयत्नांची मला कार्यक्रमातील भाषणावेळी माहिती नव्हती. लशींच्या उत्पादनासाठी मंडाविया आणि त्यांच्या चमूने केलेल्या योग्य हस्तक्षेपाबद्दल मी त्यांचे अभिनंदन करत आहे. ही माहिती अधिकृतपणे नोंदवणे मला महत्त्वाचे वाटते, असे ट्वीट गडकरी यांनी केले.

देशात सध्या कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड या लशींचे उत्पादन केले जाते. रशियात विकसित झालेल्या स्पुटनिक लशीचीही निर्मिती भारतात केली जात आहे. या लशींसाठी सीरम, भारत बायोटेक आणि डॉ. रेड्डीज या कंपन्यांना लस उत्पादनाचा परवाना देण्यात आला आहे.

लशींच्या निर्मितीचे सूत्र (फॉम्र्युला) अन्य लस उत्पादक कंपन्यांना देऊ न लशींचे उत्पादन वाढवले जाऊ  शकते. या संदर्भात, प्रत्येक राज्यातील दोन-तीन कंपन्यांमार्फत लसनिर्मिती केली जाऊ  शकते. लशींचा अतिरिक्त साठा असेल तर निर्यातही करता येईल. ही प्रक्रिया १५-२० दिवसांमध्ये पूर्ण करता येईल आणि लसनिर्मिती सुरू करता येईल. त्याद्वारे देशातील लशींचा तुटवडा भरून काढता येईल, असे गडकरी म्हणाले.

लस उत्पादनासाठी केंद्राने १२ कंपन्यांना सुविधा देण्यासाठी पावले उचलली आहेत. त्यामुळे लशींचे उत्पादन वाढू शकेल, असे केंद्रीय राज्यमंत्री मंडाविया यांनी मला सांगितले. केंद्राच्या या प्रयत्नांची मला कार्यक्रमातील भाषणावेळी कल्पना नव्हती.  – नितीन गडकरी, केंद्रीय परिवहन मंत्री   

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nitin gadkari explanation after congress criticism of modi akp
First published on: 20-05-2021 at 00:14 IST