बिहार विधानसभा निवडणुकीत नव्याने निवडून आलेल्या जदयूच्या आमदारांनी शनिवारी नितीश कुमार यांची पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी निवड केली. तत्पूर्वी शनिवारी सकाळी सध्याच्या मंत्रिमंडळाकडून बिहार विधानसभा विसर्जित करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर नितीश कुमार यांनी राज्यपालांची भेट घेऊन त्यांच्याकडे आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सुपूर्द केला. राज्यपालांनी त्यांचा राजीनामा स्विकारला असला तरी नवे सरकार स्थापन होईपर्यंत नितीश कुमार काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहतील. २४३ सदस्यांच्या बिहार विधानसभा निवडणुकीत जदयू-राजद महाआघाडीने तब्बल १७८ जागांवर विजय मिळवत भाजपला धूळ चारली होती. भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला अवघ्या ५८ जागांवरच विजय मिळवता आला होता. दरम्यान, नितीशकुमार येत्या २० नोव्हेंबरला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. सर्वसाधारण निवडणुकीनंतर तिसऱ्यांदा नितीशकुमार बिहारच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होत आहेत.