अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात फोनवरुन कुठलीही चर्चा झाली नाही. रशियाकडून तेल खरेदीचा मुद्दा असो किंवा इतर कुठलाही मुद्दा असो डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदी यांच्यात फोनवरुन संपर्क झालेला नाही असं भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेला दावा भारताने फेटाळून लावला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी एक विधान केलं होतं. ज्यामध्ये ते म्हणाले की मला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आश्वासन दिलं आहे की आम्ही (भारत) रशियाकडून तेल खरेदी करणार नाही ते बंद करु. भारताने तेल खरेदी केल्याने पुतिन यांना युद्धासाठी निधी उपलब्ध होतो त्यामुळे आमचा हा विरोध आहे. नरेंद्र मोदी यांनी रशियाकडून कच्चं तेल खरेदी न करण्याचं आश्वासन दिलं आहे. आमची फोनवर चर्चा झाली असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. मात्र भारताने हा दावा फेटाळून लावला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा काय होता?
भारताबरोबर सुरू असलेल्या टॅरिफ वादादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच एक मोठा दावा केला होता. त्यांनी म्हटले होते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना शब्द दिला आहे की भारत रशियन तेल खरेदी थांबवेल. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाइट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना म्हटले होते की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला शब्द दिला आहे की, भारत रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी थांबवेल. युक्रेनमधील युद्धावरून रशियाला एकाकी पाडण्याच्या प्रयत्नातील हे एक मोठे पाऊल आहे. आता आम्ही चीनलाही हेच करायला लावणार आहोत.”
डोनाल्ड ट्रम्प यांनी जेव्हा मोदींबाबत हा दावा केला तेव्हा काँग्रेसने केंद्र सरकारवर टीका केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वारंवार डोनाल्ड ट्रम्प यांचा दबाव सहन करत आहेत. राष्ट्रहिताऐवजी मोदी दबावात येऊन निर्णय घेतात असा आरोप काँग्रेसने केला. दरम्यान भारताने नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात कुठलाही फोन कॉल झालेला नाही असं म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा फेटाळून लावला आहे.
