मुसळधार पाऊस, भूस्खलन आणि ढगफुटी अशा घटनांमुळे उत्तर भारतात, विशेषतः जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये शुक्रवारी रात्री आणि शनिवारी मोठ्या प्रमाणात प्राणहानी झाली. जम्मू-काश्मीरमध्ये विविध घटनांमध्ये एकूण ११ जण मृत्युमुखी पडले असून हिमाचल प्रदेशच्या चंबा जिल्ह्यात १० जण मरण पावले. उत्तराखंडच्या बागेश्वरमध्ये ढगफुटीनंतर बचाव आणि शोधकार्य सुरू आहे. तर पंजाबच्या फिरोजपूर येथे पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलवण्यात यश आले आहे.
जम्मू आणि काश्मीरच्या रियासी जिल्ह्याच्या बद्देर गावात झालेल्या भूस्खलनामुळे डोंगराच्या उतारावरील एक घर पूर्णपणे ढिगाऱ्याखाली दबले गेले. त्यात एका कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाला. शनिवारी पहाटे ही घटना घडली तेव्हा घरातील सर्वजण झोपेत होते आणि ते जिवंतपणी गाडले गेले अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. रामबन जिल्ह्यात राजगड या डोंगराळ गावात शुक्रवारी रात्री ढगफुटी होऊन दोन भावांसह चौघांचा मृत्यू झाला. बचाव पथकाच्या सदस्यांनी ढिगाऱ्याखालून चार मृतदेह बाहेर काढले अशी माहिती पोलिसांनी दिली. या घटनेत दोघेजण बेपत्ता झाले असून त्यांचा शोध सुरू आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये १४ ऑगस्टपासून ढगफुटी आणि भूस्खलनाच्या अनेक घटना घडल्या असून त्यामुळे मालमत्तेची आणि जीविताची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. जम्मू विभागात आतापर्यंत १३० जणांचा मृत्यू झाला असून १४० जखमी झाले आहेत. त्याशिवाय ३२ यात्रेकरू अजूनही बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे.
वार्षिक यात्रेत अडथळे
हिमाचल प्रदेशच्या चंबा जिल्ह्यामध्ये वार्षिक मणिमहेश यात्रेला मुसळधार पाऊस, भूस्खलन आणि प्रतिकूल हवामानाचा फटका बसला आहे, अशी माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (एसडीएमए) दिली आहे. यात्रेदरम्यान पावसाशी संबंधित घटनांमध्ये आतापर्यंत किमान १० भाविकांचा मृत्यू झाला असून चार जण अद्याप बेपत्ता आहेत अशी माहिती अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली. त्याशिवाय अन्य सात जण जखमी झाले आहेत. सातत्याने पडणारा पाऊस आणि भूस्खलनाच्या घटनांमुळे बचावकार्यात अडथळे येत असल्याची माहिती ‘एसडीएमए’ने दिली.
सातत्याने पडणारा पाऊस आणि भूस्खलनाच्या घटनांमुळे भरमौर आणि चंबादरम्यानचा रस्ता बंद झाला आहे. त्यामुळे अनेक यात्रेकरू अडकले आहेत. त्यांची सुखरूप सुटका करण्यासाठी बचाव पथकांनी मोठे बचावकार्य सुरू केले असून आतापर्यंत सहा हजार भाविकांची सुटका करण्यात आली आहे. – डी. सी. रैना, विशेष सचिव, ‘एसडीएमए’