लोकसभा निवडणुकीचं घोडामैदान जवळ आलं आहे. सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षांची आघाडी दोहोंनी या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. विरोधकांच्या आघाडीने I.N.D.I.A. हे नवं नाव धारण केलं आहे. यामध्ये काँग्रेससह प्रमुख विरोधी पक्ष आहेत. नुकतीच या गटाची एक बैठकही पार पडली. मात्र आता विरोधकांच्या या इंडिया नावाच्या आघाडीला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नवं नाव दिलं आहे.
काय म्हटलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी?
विरोधकांची जी नवी आघाडी आहे ती आघाडी म्हणजे इंडिया नाही तर घमंडिया आहे. असं आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. बिहारमध्ये एनडीएच्या खासदारांची एक बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीत बोलत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे नवं नाव विरोधकांच्या आघाडीला दिलं आहे.
विरोधकांच्या आघाडीला जेव्हा इंडिया हे नाव देण्यात आलं तेव्हापासूनच या नावावर टीका होते आहे. सुरुवातीला या विषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी असं म्हणाले होते की युपीए हे नाव बदनाम झालं होतं म्हणून आता विरोधकांनी इंडिया हे नाव घेतलं आहे. दुसरीकडे आता देशातली लढाई इंडिया विरुद्ध एनडीए अशी आहे असं काँग्रेसने जाहीर केलं आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या आघाडीवर टीका करण्याची एकही संधी सोडलेली नाही.
नितीशकुमारांवर टीका
बिहारमधल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नितीश कुमारांवरही टीका केली. भाजपाने नितीश कुमार यांना तीन वेळा मुख्यमंत्री पद दिलं. या निवडणुकीच्या वेळी त्यांच्या जागा कमी झाल्या होत्या तरीही त्यांना मुख्यमंत्रीपदाची खुर्ची दिली. एनडीएकडे त्याग भावना आहे आणि एनडीएच स्थिर सरकार देऊ शकते. एनडीएची साथ ज्यांनी सोडली ते सगळे स्वार्थी आहेत असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.