वैज्ञानिकांनी आता टोमॅटोची गोळी तयार केली असून, त्यामुळे रक्ताचा प्रवाह सुरळीत राहतो, तसेच रक्तवाहिन्यांची लवचिकता पन्नास टक्क्यांनी वाढते. परिणामी हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाणही कमी होते असे दिसून आले आहे.
अटेरोनॉन कॅप्सूल असे या गोळीचे नाव असून, त्यात लायकोपिन हे टोमॅटोतील रसायन असते. त्यामुळे टोमॅटोला लाल रंग प्राप्त झालेला असतो. लायकोपिनमुळे रक्तवाहिन्यातील मेदाम्लांच्या थरांचे विघटन होते.
केंब्रिज विद्यापीठाच्या वैज्ञानिकांनी या गोळीच्या चाचण्याही घेतल्या असून, त्यात रक्ताचा प्रवाह सुरळीत झाल्याचे दिसून आले आहे. हृदयविकाराच्या रुग्णातील रक्तवाहिन्यांच्या आतल्या स्तराचा पोत सुधारला आहे. या गोळीमुळे त्यांच्या धमन्यांची लवचिकता पन्नास टक्क्यांनी वाढल्याचे संशोधन म्हटले आहे.
‘डेली मेल’ने दिलेल्या वृत्तानुसार हृदयविकाराने होणारे नुकसान टाळण्याचा प्रयत्न या गोळीत केला आहे, पण ती संधिवात, मधुमेह व इतर कमी वेगाने पसरणाऱ्या कर्करोगांवरही गुणकारी ठरू शकते. एका गोळीत २.७ किलो पिकलेले टोमॅटो सेवन केल्यानंतर जेवढा फायदा मिळतो तेवढा मिळतो.
भूमध्यसागरी आहारात टोमॅटो, मासे, भाज्या, ऑलिव्ह तेल यांचा समावेश आहे, त्यामुळे कोलेस्टेरॉल कमी होते व हृदयविकाराला अटकाव होतो. दोन महिन्यांच्या चाचण्यात ३६ हृदयरोग्यांना या गोळय़ा दिल्या व ३६ निरोगी लोकांनाही दिल्या. त्यांचे वय सरासरी ६७ होते. त्यात असे दिसून आले, की या गोळय़ांमुळे रक्तवाहिन्यांच्या अस्तरातील पेशींचा जो थर असतो त्या एंडोथेलियमचे कार्य सुधारले. नायट्रिक ऑक्साइडला त्या चांगला प्रतिसाद देऊ लागल्या. या नायट्रस ऑक्साइडमुळे रक्तवाहिन्या प्रसरण पावतात. त्यामुळे गोळीचे अतिशय चांगले परिणाम दिसले असून ही बाब अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या बैठकीत सादर करण्यात आली. कॅमन्युट्रा या कंपनीने ही टोमॅटोची गोळी अटेरोनॉन नावाने तयार केली.
कंपनीचे सल्लागार असलेले मेंदूरोगतज्ज्ञ पीटर किर्कपॅट्रिक यांनी सांगितले, की प्राथमिक निष्कर्ष तरी अपेक्षेपेक्षा खूपच चांगले आहेत. यात आणखी संशोधन करता येईल. हृदयविकारावरील स्टॅटिन औषधांना पर्याय देता येईल.
ब्रिटिश हार्ट फाऊंडेशनचे माइक नॅपटन यांनी सांगितले, की लायकोपिनमुळे रक्तप्रवाहात सुधारणा होते हे दिसून आले असले तरी त्यामुळे हृदयविकाराची शक्यता कमी होतेच असे म्हणता येत नाही.
* कंपनीचे नाव-कॅम्युनट्रा
* गोळीचे नाव-अटेरोनॉन
* क्षमता-२.७ किलो टोमॅटोइतकी
* प्रमुख घटक- लायकोपिन
* परिणाम- मेदाम्लांचे विघटन व त्यामुळे हृदयाला रक्तपुरवठा सुरळीत
संग्रहित लेख, दिनांक 8th Jan 2013 रोजी प्रकाशित
हृदयविकार टाळण्यासाठी आता ‘टॉमेटो पिल’
वैज्ञानिकांनी आता टोमॅटोची गोळी तयार केली असून, त्यामुळे रक्ताचा प्रवाह सुरळीत राहतो, तसेच रक्तवाहिन्यांची लवचिकता पन्नास टक्क्यांनी वाढते. परिणामी हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाणही कमी होते असे दिसून आले आहे. अटेरोनॉन कॅप्सूल असे या गोळीचे नाव असून, त्यात लायकोपिन हे टोमॅटोतील रसायन असते.
First published on: 08-01-2013 at 01:08 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Now a daily tomato pill to cut heart attack risk