स्त्रीचे विवस्त्र किंवा अर्धवस्त्र छायाचित्र हे अश्लिल असतेच असे नाही, असे आज (रविवार) सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे. जोपर्यंत अशा स्वरूपाच्या छायाचित्रांमधून जाणीवपूर्वक व प्रतीकात्मक कामभावना व्यक्त केली जात नाही, तोपर्यंत ते छायाचित्र अश्‍लील ठरत नाही. असे म्हणत न्यायालयाने जर्मन टेनिसपटू बोरिस बेकरचे त्याच्या प्रेयसीसोबतचे विवस्त्र छायाचित्राविरूद्ध सुरु असलेला खटला संपुष्टात आणला आहे.
ज्या छायाचित्रांमध्ये वासनापूर्ण विचार निर्माण करण्याची प्रवृत्ती असते, त्यांना अश्लिल म्हटले जाऊ शकते, असे न्यायाधीश एस राधाकृष्णन आणि ए के सीकेरी यांच्या खंडपीठाने म्हटले आहे.  काळानुरूप आणि वेळेनुसार अश्लिलतेची संकल्पनाही बदलते. एका टप्प्यावर जे अश्‍लील म्हणून गणले जाते; ते कदाचित काळाच्या दुसऱ्या टप्प्यावर अश्‍लील मानले जाणार नाही. यामुळे एका सर्वसामान्य व्यक्तीच्या दृष्टिकोनामधून अश्‍लीलतेची मर्यादा ठरविली जावी, असे न्यायालयाने म्हटले.
वांशिक भेदभावाची अन्यायकारक वागणूक संपावी व प्रेमाचा प्रसार व्हावा, यासाठी बेकरने प्रेयसीसोबत विवस्त्र छायाचित्र काढले होते. या छायाचित्राचा उद्देश्य  संदेश देणे होते. त्वचेच्या रंगाला अधिक महत्व नसते आणि रंगावर प्रेमाचा विजय होतो. तसेच, यामुळे लोकांमध्ये चांगली भावना जागरून होऊन पुढे जाऊन गौरवर्णीय पुरुष हे सावळ्या रंगाच्या महिलांशी लग्न करण्याची शक्यता वाढू शकते. त्यामुळे हे छायाचित्र प्रशंसनीय ठरते व अश्‍लील ठरत नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.