ओडिशामधल्या पुरी येथील जगन्नाथ मंदिरात अनधिकृतपणे प्रवेश केल्याच्या आरोपाखाली ओडिशा पोलिसांनी नऊ बांगलादेशींना ताब्यात घेतलं आहे. सोमवारी (४ मार्च) एका अधिकाऱ्याने अधिकृतपणे याबाबतची माहिती देताना सांगितलं की, मंदिर प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचं उल्लंघन करून काही गैर हिंदू बांगलादेशी मंदिरात प्रवेश करत होते. त्यांना मंदिर परिसरातून ताब्यात घेण्यात आलं आहे. विश्व हिंदू परिषदेच्या काही कार्यकर्त्यांनी याप्रकरणी तक्रार केली होती. या कार्यकर्त्यांनी तक्रारीत म्हटलं होतं की, काही गैर हिंदू बांगलादेशी इसम पुरातन मंदिरात प्रवेश करत आहेत. तसेच मंदिर समितीच्या नियमांचं उल्लंघन करत आहेत. त्यानंतर याप्रकरणी सिंहद्वार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी नऊ बांगलादेशी इसमांना ताब्यात घेतलं आहे.
पुरीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुशील मिश्रा म्हणाले, आम्हाला काही बांगलादेशी गैर-हिंदूंनी मंदिरात प्रवेश केल्याबाबतची तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांचं एक पथक मंदिराकडे रवाना झालं. या संशयास्पद इसमांना पोलिसांनी अडवलं आणि ताब्यात घेतलं. त्यानंतर त्यांची चौकशी करण्यात आली. त्यांच्या संशयास्पद हालचाली पाहता आम्ही नऊ बांगलादेशींना ताब्यात घेतलं आहे. तसेच काही वरिष्ठ अधिकारी त्यांची चौकशी करत आहेत.
मदिराच्या नियमांनुसार या मंदिरात केवळ हिंदू भाविक प्रवेश करू शकतात. सुशील मिश्रा यांनी सांगितलं की, ज्या बांगलादेशींना ताब्यात घेतलं आहे ते गैर हिंदू असतील तर त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल. आम्ही त्यांचे पासपोर्ट तपासले आहेत. तपासाअंती लक्षात आलं आहे की, या नऊ जणांपैकी एक इसम हिंदू आहे. इतरांचे पासपोर्ट आणि इतर दस्तावेजांची तपासणी केली जात आहे. आम्ही ज्या नऊ जणांना ताब्यात घेतलंय, त्यापैकी चार जणांनी मंदिरात प्रवेश केला होता. तर इतर पाचजण मंदिरात प्रवेश करण्याच्या प्रयत्नात होते.
हे ही वाचा >> VIDEO : लग्नाला जाणाऱ्या वऱ्हाडाची कार कालव्यात कोसळली; तीन भावंडांचा बुडून मृत्यू, तिघे बेपत्ता
जगन्नाथ मंदिराच्या नियमावलीनुसार गैर-हिंदू आणि मांसाहारी व्यक्तींना मंदिरात जाण्याची परवानगी नाही. अलीकडेच यूट्युबर काम्या जानीच्या जगन्नाथ मंदिर दर्शनावरून मोठा वाद उफाळला होता. काम्या जानी गोमांस खात असल्याचा दावा काही लोकांनी केला होता. गोमांस खाणारी काम्या जानी जगन्नाथ मंदिरात गेलीच कशी? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. गोमांस खाणाऱ्यांना मंदिरात जाण्याची परवानगी नसून काम्या जानीने मंदिरात प्रवेश केल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. परंतु, काम्या जानीने नंतर स्पष्टीकरण दिलं की, ती गोमांस खात नाही.