OLA Employee Commits Suicide: एका ३८ वर्षीय कर्मचाऱ्याने मानसिक छळ आणि आर्थिक शोषणामुळे आत्महत्या केल्याच्या आरोपावरून कंपनीविरुद्ध दाखल केलेल्या एफआयआरविरोधात ओला इलेक्ट्रिकने कर्नाटक उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सोमवारी जाहीर केलेल्या निवेदनात, कंपनीने म्हटले आहे की पीडित अरविंद यांनी “या आर्थिक शोषणाबद्दल किंवा कोणत्याही मानसिक छळाबद्दल कोणतीही तक्रार नोंदवलेली नव्हती”. “ते ज्या पदावर काम करत होते, त्या पदावरील कर्मचाऱ्यांचा प्रवर्तकासह कंपनीच्या उच्च व्यवस्थापनाशी थेट संवाद होण्याचा संबंधच नव्हता”, असे त्यात म्हटले आहे.
“आम्ही कर्नाटक उच्च न्यायालयात आमच्याविरोधात दाखल केलेल्या एफआयआरला आव्हान दिले आहे. न्यायालयाने ओला इलेक्ट्रिक आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या बाजूने संरक्षणात्मक आदेश दिले आहेत”, असे त्यात म्हटले आहे.
आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचे आत्महत्येपूर्वी लिहिलेले पत्र पोलिसांना सापडले आहे. त्यामध्ये मृत कर्मचाऱ्याने ओलाचे संस्थापक भाविश अग्रवाल यांच्यासह त्याच्या वरिष्ठांवर मानसिक छळ आणि आर्थिक शोषणाचा आरोप केला आहे.
“आमचे सहकारी अरविंद यांच्या दुर्दैवी निधनाने आम्हाला खूप दुःख झाले आहे. या कठीण काळात आम्ही त्यांच्या कुटुंबासोबत आहोत. अरविंद साडेतीन वर्षांहून अधिक काळ ओला इलेक्ट्रिकमध्ये होते आणि ते बंगळुरू येथील आमच्या मुख्यालयात कार्यरत होते”, असे कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले.
पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अरविंद २०२२ पासून ओला इलेक्ट्रिकमध्ये होमोलोगेशन इंजिनिअर म्हणून काम करत होते. २८ सप्टेंबर रोजी त्यांनी बेंगळुरूच्या चिक्कलसांद्रा येथील त्यांच्या घरी विष प्राशन केले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले होते, परंतु काही तासांनी त्यांचा मृत्यू झाला.
अरविंद यांच्या भावाने पत्रकारांना सांगितले की, घरातून सापडलेल्या सुसाइड नोटमध्ये आणखी एक अभियंता सुब्रत कुमार दास आणि अग्रवाल यांचे नाव आहे. यामध्ये त्यांनी मानसिक छळ आणि पगार व भत्ते नाकारल्याचा आरोप केला आहे. त्यांनी सांगितले की, भावाच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी त्यांच्या खात्यात १७,४६,३१३ रुपये बँक ट्रान्सफर करण्यात आले. त्यांनी असा दावा केला की, जेव्हा त्यांनी स्पष्टीकरणासाठी ओलाशी संपर्क साधला, तेव्हा त्यांना अस्पष्ट उत्तरे मिळाली.