जगभरात करोनाबाबत नव्याने धास्ती निर्माण करणारा ओमायक्रॉन व्हेरिएंट अद्याप भारतापासून दूर असल्यामुळे देशातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला होता. मात्र, भारतीयांची ही निश्चिंतता अल्पजीवी ठरली आहे. कारण भारतात ओमायक्रॉनचे दोन रुग्ण आढळल्याची माहिती केंद्रीय आरोग्य विभागाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे. पत्रकार परिषदेत बोलताना लव अग्रवाल यांनी कर्नाटकमध्ये ओमायक्रॉनचे दोन रुग्ण आढळल्याचं सांगितलं असून आत्तापर्यंत एकूण २९ देशांमध्ये ओमायक्रॉन व्हेरिएंटचे रुग्ण आढळल्याचं देखील सांगितलं. त्यामुळे ओमायक्रॉन आता हळूहळू हातपाय पसरायला लागल्याचं चित्र दिसू लागलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अवघ्या दोनच दिवसांपूर्वी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान लोकसभेत बोलताना देशात एकही ओमायक्रॉनचा रुग्ण नसल्याची माहिती दिली होती. त्यामुळे दक्षिण अफ्रिका आणि अफ्रिकेतील इतर काही देशांमध्ये आढळलेला हा करोनाचा नवा व्हेरिएंट भारतापासून अद्याप दूर असल्याचा दिलासा देशवासीयांना मिळाला होता. मात्र, आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पत्रकार परिषद घेऊन कर्नाटकमध्ये दोन रुग्णांमध्ये ओमायक्रॉन व्हेरिएंट आढळल्याची माहिती दिली आहे. आत्तापर्यंत २९ देशांमध्ये ओमायक्रॉन व्हेरिएंटची लागण झालेले एकूण ३७३ रुग्ण सापडल्याचं देखील आरोग्य मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

दोन्ही रुग्णांमध्ये सौम्य लक्षणं

दरम्यान, कर्नाटकमध्ये सापडलेले ओमायक्रॉनचे दोन्ही रुग्ण हे परदेशी नागरिक असल्याची माहिती मिळत आहे. या दोघांचं वय ६६ वर्षे आणि ४६ वर्षे असं असून त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांची चौकशी करून त्यांची चाचणी करण्यात येत असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, ओमायक्रॉनचा संसर्ग आढळून आलेल्या दोघांमध्ये करोनाची अत्यंत सौम्य लक्षणं असून कोणतीही गंभीर लक्षणं दिसत नसल्याची माहिती देखील देण्यात आली आहे.

घाबरून जाण्याची गरज नाही

ओमायक्रॉनचे दोन रुग्ण सापडल्यामुळे घाबरून जाण्याची आवश्यकता नसल्याचं सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितलं आहे. “घाबरून जाण्याची आवश्यकता नसली, तरी सतर्क राहाणं आवश्यक आहे. कोविडचे नियम पाळणं आणि गर्दी टाळणं हे महत्त्वाचं आहे”, असं लव अग्रवाल म्हणाले.

ओमायक्रॉन भारतातही दाखल? ICMR च्या डॉक्टर पांडा यांची धक्कादायक माहिती; म्हणाले, “काही दिवसांत…”

डोंबिवलीतही ओमायक्रॉनचा रुग्ण?

दक्षिण अफ्रिकेतून नुकत्याच डोंबिवलीत परतलेली एक व्यक्ती करोनाबाधित आढळून आली होती. दक्षिण अफ्रिकेतच ओमायक्रॉनचे मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळून आल्यामुळे सगळीकडे भितीचं वातावरण पसरलं होतं. हा रुग्ण ओमायक्रॉनचाच आहे की करोनाच्या इतर व्हेरिएंटचा, याविषयी अद्याप निश्चित माहिती मिळू कलेली नसून या व्यक्तीच्या चाचणीचे नमुने जेनोम सिक्वेन्सिंगसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सकाळी दिली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Omicron variant patients in india two cases in karnataka found pmw
First published on: 02-12-2021 at 16:40 IST