India-Pakistan Ceasefire: संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला २१ जुलैपासून सुरुवात झाली असून, आज संसदेत पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरवर चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेदरम्यान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला इशारा देत म्हटले आहे की, जर भविष्यात पाकिस्तानने कोणतेही चुकीचे पाऊल उचलले, तर ऑपरेशन सिंदूर पुन्हा सुरू केले जाईल.
“१० मे रोजी, जेव्हा भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमधील अनेक हवाई तळांवर जोरदार हल्ले केले, त्यानंतर पाकिस्तानने पराभव स्वीकारला आणि शस्त्रविरामाचा प्रस्ताव दिला. हा प्रस्ताव स्वीकारताना पाकिस्तानला इशारा देण्यात आला होता की, ही कारवाई फक्त थांबवण्यात आली आहे. भविष्यात पाकिस्तानकडून कोणतेही गैरप्रकार घडल्यास, ही कारवाई पुन्हा सुरू केली जाईल.”
पाकिस्तानवर टीका करताना राजनाथ सिंह पुढे म्हणाले की, “ज्या देशाकडे लोकशाहीचा एक अंशही नाही, त्याच्याशी वाटाघाटी करता येत नाहीत. गोळ्यांच्या आवाजात संवादाचा आवाज हरवला जातो.” राजनाथ सिंह यांनी पुढे स्पष्टपणे सांगितले की, “भारताने आता सुदर्शन चक्र उचलले आहे, आता शांत बसणार नाही.”
लष्करी नेतृत्वाने केवळ…
राजनाथ सिंह यावेळी म्हणाले की, “आपल्या लष्करी नेतृत्वाने केवळ परिपक्वता दाखवली नाही तर, ऑपरेशन सिंदूर राबवण्यापूर्वी सैन्याने प्रत्येक पैलूचा अभ्यास केला. आमच्याकडे अनेक पर्याय होते, परंतु आम्ही असे पर्याय निवडले ज्यामुळे दहशतवादी अड्ड्यांचे जास्तीत जास्त नुकसान झाले आणि पाकिस्तानातील सामान्य लोकांचे कोणतेही नुकसान झाले नाही. लष्कराच्या हल्ल्यात ९ दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त झाले, एका अंदाजानुसार, यामध्ये १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले. हा फक्त एक अंदाज आहे, हा आकडा यापेक्षा खूप जास्त असू शकतो.”
पाकिस्तानचा प्रस्ताव
राजनाथ सिंह यांनी आपल्या भाषणात असेही स्पष्ट केले की, ऑपरेशन सिंदूर कोणाच्याही दबावाखाली थांबवण्यात आलेले नाही. यावेळी त्यांनी कोणाचेही नाव घेतले नाही, परंतु हे निश्चितपणे स्पष्ट केले की युद्धबंदी पाकिस्तानच्या प्रस्तावावरून झाली. संरक्षणमंत्र्यांच्या मते, तिन्ही सैन्यांना पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले होते, त्यांना लक्ष्य निवडण्यास देखील सांगण्यात आले होते. संरक्षणमंत्र्यांनी आपल्या भाषणात हे देखील स्पष्ट केले आहे की, ऑपरेशन सिंदूर फक्त पुढे ढकलण्यात आले आहे, ते पुन्हा सुरू केले जाऊ शकते. त्यांनी म्हटले आहे की जर पाकिस्तानने कोणतेही गैरप्रकार केले तर त्यांना योग्य उत्तर दिले जाईल.