भुवनेश्वर : ओडिशात गुरुवारी मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनात एकाचा मृत्यू, तर दोन जण बेपत्ता झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. गुरुवारी सायंकाळी गंजम जिल्ह्यातील गोपाळपूर येथील कमी दाबाचा पट्टा राज्याच्या किनारपट्टी भागातून पुढे गेल्याने मुसळधार पावसाला सुरुवात झाली. शुक्रवारी सकाळी साडेआठपर्यंत हा मुसळधार पाऊस सुरू होता, असे हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

‘गजपती येथील विविध सहा ठिकाणी गेल्या दोन दिवसांत झालेल्या भूस्खलनात एकाचा मृत्यू तर दोन जण बेपत्ता झाले. आर उदयगिरी पोलीस ठाणे हद्दीतील एका भागात भूस्खलन झाल्यानंतर ढिगाऱ्याखालून गुरुवारी मृत व्यक्तीला बाहेर काढण्यात आले’, असे पोलीस अधीक्षक जतिंद्र कुमार पांडा यांनी ‘पीटीआय’ला सांगितले. तर जिल्ह्यातील रायगड भागात पेकटजवळील एका भागात भूस्खलन झाल्याने सत्तर वर्षीय कार्तिक शबारा आणि त्यांचा मुलगा राजीव शबारा बेपत्ता झाले, असे पांडा यांनी सांगितले.

‘बचाव कार्य सुरू आहे. रायगडला नुआगड आणि आर उदयगिरीशी जोडणारे रस्ते उद्ध्वस्त झाले आहेत, भूस्खलनामुळे अडकलेल्या महेंद्रगिरी टेकड्यांवरून २४ पर्यटकांना वाचवण्यात आले, असे ते म्हणाले. दरम्यान, मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्याचे आदेश मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी वाणिज्य आणि वाहतूकमंत्री बिभूती भासन जेना यांना दिले आहेत.