Sam Altmen on ChatGPT Electricity Consumption: OpenAI चे CEO अर्थात मुख्य कार्यकारी अधिकारी सॅम अस्टमन यांनी नुकत्याच केलेल्या एका विधानावरून सध्या मोठी चर्चा पाहायला मिळत आहे. सध्या एआय अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वाढता वापर चर्चेचा विषय ठरतो आहे. येत्या काही काळात हा वापर अनेक पटींनी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर सॅम अल्टमन यांनी केलेल्या विधानावरून सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. “एआयला फक्त थँक यू किंवा प्लीज म्हटलं, तरी हजारो डॉलर्स खर्च येतो”, असं अल्टमन यांनी एका सोशल मीडिया पोस्टवरच्या उत्तरादाखल म्हटलं आहे!
खरंतर चॅटजीपीटीसारखे एआय प्लॅटफॉर्म इंटरनेटचं कनेक्शन असणाऱ्या सगळ्यांनाच अगदी मोफत वापरण्यासाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे अगदी कुणीही एआयचा वापर करू शकतं. एआयकडून वेगवेगळ्या गोष्टींबाबत माहिती घेण्यासाठी त्याला अनेक प्रश्नही विचारले जातात. पण सॅम अल्टमन यांनी केलेल्या दाव्यानुसार, अशा एआयला आपण फक्त थँक यू किंवा प्लीज म्हटलं, तरी हजारो डॉलर्स खर्च होतात! पण हे नेमकं होतं कसं?
नेमकी चर्चा का सुरू झाली?
या सगळ्या चर्चेला सुरुवात झाली ती एका सोशल मीडिया पोस्टवरून. टोमी नावाच्या एका युजरनं यसंदर्भात X वर एक पोस्ट शेअर केली होती. “मला विशेष वाटतं की लोक जेव्हा ओपन एआयच्या माध्यमांना साधं प्लीज किंवा थँक यू म्हणत असतील, तेव्हा त्याच्या उत्तरासाठी लागणाऱ्या विजेच्या वापराचा खर्च नेमका किती येत असेल?” अशी पोस्ट या युजरनं केली. त्यावर सॅम अल्टमन यांनी उत्तर दिलं आहे. “हजारो डॉलर्स खर्च होत असतील, आपल्याला कल्पनाही नसेल”, असा रिप्लाय अल्टमन यांनी पोस्टवर दिला आहे.
नेमका एवढा खर्च आहे कसला?
दरम्यान, वरवर पाहता जरी ही चर्चा विनोदी वाटत असली, तरी त्यामागे एआयच्या कार्यप्रणालीतील महत्त्वाच्या बाबी कारणीभूत असण्याचा अंदाज आहे. प्रत्येक वेळी एखाद्या युजरनं चॅटजीपीटीवर एखादा मेसेज टाकला, मग तो मेसेज अगदी एखाद्या शब्दाचा का असेना, त्यावर एआयच्या माध्यमातून सविस्तर प्रतिसाद दिला जातो. प्रश्न विचारल्यानंतर त्यावर तातडीने प्रक्रिया करून, प्रश्न विचारलेल्या भाषेतच उत्तर तयार करून ते दिलं जाणं या प्रक्रियेसाठी मोठ्या प्रमाणावर माहितीचं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वहन केलं जातं. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर विजेचा वापरही केला जातो. याचाच खर्च सॅम अल्टमन यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केला आहे!
AI साठी विजेचा वाढता वापर
एआयचा वापर जसजसा वाढत जाईल, तसतशी एआयसाठीच्या विजेची मागणीही वाढत जाईल. परिणामी एआयच्या डाटा सेंटर्सकडून विजेचा वापर वाढू लागल्याचं दिसत आहे. एका अंदाजानुसार, २०२८ पर्यंत डाटा सेंटर्सकडून वापरल्या जाणाऱ्या विजेपैकी तब्बल १९ टक्के वीज ही फक्त एआयसाठी वापरली जाईल. गोल्डमन सॅचच्या अहवालानुसार ChatGPT वर एक प्रश्न विचारला असता त्याच्या उत्तरासाठी २.९ वॅट प्रतितास विजेचा वापर होतो. हे प्रमाण गुगलवर होणाऱ्या सर्चसाठी लागणाऱ्या विजेच्या तुलनेत तब्बल १० पट आहे.