Conversion Network Agra: छंगूर बाबा उर्फ जलालुद्दीन रॅकेटनंतर, उत्तर प्रदेश पोलिसांनी बेकायदेशीर धर्मांतराचे एक मोठे नेटवर्क उघडकीस आणले आहे. यासाठी “ऑपरेशन अस्मिता” अंतर्गत ६ राज्यांमधून १० जणांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांचे म्हणणे आहे की, या नेटवर्कमध्ये सहभागी असलेले लोक लव्ह जिहादद्वारे धर्मांतर करायचे, परदेशातून निधी मिळवायचे आणि धर्मांधता पसरवायचे, जी दहशतवादी संघटना आयसिसची सिग्नेचर शैली आहे. या नेटवर्कचे बंदी घातलेल्या संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया, सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया आणि पाकिस्तानच्या दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचेही संकेत मिळाले आहेत.
या वर्षी मार्चमध्ये आग्राच्या सदर बाजार पोलीस ठाण्यात दोन सख्ख्या बहिणी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यांचे वय ३३ वर्षे आणि १८ वर्षे असे आहे. त्यानंतर पोलिसांनी बेकायदेशीर धर्मांतर कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. पोलिसांनी तपास केला तेव्हा हे प्रकरण एका मोठ्या नेटवर्कशी संबंधित असल्याचे आढळले. त्यानंतर प्रकरण सायबर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले आणि सखोल तपास सुरू करण्यात आला.
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, या नेटवर्कने इस्लामिक उपदेश, यूट्यूब चॅनेल आणि गुप्त ऑनलाइन सत्रांच्या माध्यमातून हिंदू मुलींचे ब्रेनवॉश करण्यासाठी स्थानिक एजंट्सची नेमणूक केली होती. अधिकाऱ्यांनी सांगितले की, मुलींना विविध आमिषे दाखवून त्यांना कट्टरपंथी बनवण्यात आले आणि नंतर बनावट ओळखपत्रांचा वापर करून त्यांची वेगवेगळ्या राज्यांत तस्करी करण्यात आली. याबाबत इंडिया टुडे टीव्हीने वृत्त दिले आहे.
या विशिष्ट प्रकरणात, मोठी बहीण प्राणीशास्त्रात एम.फिल करत असताना आग्रामध्ये कोचिंग क्लासेस दरम्यान सायमा नावाच्या एका काश्मिरी महिलेच्या संपर्कात आली. सायमाने तिला २०२१ मध्ये काश्मीरला येण्यास राजी केल्याचा आरोप आहे, ज्यामुळे तिचे धर्मांतर झाले. त्यानंतर तिला शोधून परत आणले, पण ती मार्च २०२५ मध्ये पुन्हा गायब झाली आणि यावेळी ती तिच्या १९ वर्षांच्या धाकट्या बहिणीलाही घेऊन गेली. काही दिवसांनी दोघीही कोलकातामध्ये सापडल्या.
कुटुंबाने इंडिया टुडे टीव्हीला सांगितले की, त्यांची मोठी मुलगी पहिल्यांदा बेपत्ता झाल्यानंतर हिंदू श्रद्धांपासून दूर गेली होती, कौटुंबिक विधी सोडून पडदा आणि हिजाबची वकिली करू लागली होती. त्यांनी असा दावा केला की, त्या बहिणी एकाच खोलीत राहत होत्या, ज्यामुळे धाकटी थोरलीच्या प्रभावाला बळी पडली.