लष्कराच्या ‘एलिट पॅरा कमांडों’नी श्रीनगरबाहेर हाती घेतलेल्या ‘ऑपरेशन महादेव’ला महत्त्वाचे यश मिळाले असून, पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार या चकमकीत मारला गेल्याचे अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुलेमान उर्फ आसिफ हा २२ एप्रिलच्या पहलगाम हल्ल्याचा सूत्रधार असल्याचा संशय असून, पॅरा कमांडोंनी केलेल्या कारवाईत त्याच्यासह त्याचे दोन साथीदारही मारले गेले.

दहशतवाद्यांनी सॅटेलाइट फोनचा वापर केल्याचे तांत्रिक सिग्नल प्राप्त झाल्यानंतर सुरक्षा दलांनी अचानक ऑपरेशन महादेव ही मोहीम हाती घेतली. जिब्रान आणि हमझा अफगाणी अशी मारल्या गेलेल्या अन्य दोन दहशतवाद्यांची नावे असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. श्रीनगरबाहेरील जंगल परिसरामध्ये ही चकमक झाली. यापैकी जिब्रान हा गेल्या वर्षी सोनमर्ग बोगदा प्रकल्पावर केलेल्या हल्ल्यामध्ये सहभागी असल्याचे सांगण्यात आले. त्या हल्ल्यात एका डॉक्टरसह सात जणांचा मृत्यू झाला होता.

रविवारी रात्री ११.३० च्या सुमारास २४ राष्ट्रीय रायफल्स आणि ‘४ पॅरा’ जवानांचा समावेश असलेल्या एका पथकाने तीन दहशतवाद्यांच्या गटाचा शोध घेतला. पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांनी वापरलेल्या उपकरणासारखेच तांत्रिक संकेत त्यांच्याकडून मिळाल्यानंतर जवानांनी हरवानच्या जंगलात कारवाई सुरू केली. मुनार गावात शोधमोहीम सुरू असताना, दहशतवाद्यांना घेरा घातलेल्या ठिकाणाहून गोळीबार सुरू झाला. या वेळी लष्कराने प्रत्युत्तरादाखल गोळीबार सुरू केला. त्यात तिघे दहशतवादी मारले गेले. सुरक्षा दलांनी घटनास्थळावरून एक एम-४ कार्बाइन रायफल, दोन एके रायफल आणि इतर शस्त्रसाठा जप्त केला आहे.

पोलीस महानिरीक्षक (काश्मीर विभाग) व्ही. के. बिरदी यांनी सांगितले की, ही एक दीर्घकाळ चाललेली कारवाई होती. मोहीम पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण तपशील सार्वजनिक केला जाईल, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, श्रीनगरस्थित ‘चिनार कोअर’ने ‘एक्स’वरील संदेशात या मोहिमेची माहिती दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुफ्तींची पाकिस्तानबरोबर चर्चेची मागणी

श्रीनगर : भारताने पाकिस्तानबरोबर युद्धाची भाषा थांबवावी आणि चर्चेला सुरुवात करावी, अशी मागणी जम्मू आणि काश्मीर राज्याच्या माजी मुख्यमंत्री आणि ‘पीडीपी’च्या अध्यक्ष मेहबुबा मुफ्ती यांनी सोमवारी केंद्र सरकारकडे केली. भारताला पुढे जायचे असेल आणि आपला विकास साधायचा असेल तर चर्चा आणि सामोपचाराचा मार्ग निवडावा, असे मुफ्ती यांनी म्हटले आहे. श्रीनगरमध्ये ‘पीडीपी’च्या २६व्या वर्धापनदिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात मुफ्ती यांनी आपली भूमिका मांडली.