Baba Ramdev on Operation Sindoor : पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्कराने पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू काश्मीरमधील ९ दहशतवादी तळांवर हल्ले केले. या हल्ल्यात भारतीय लष्कराने दहशतवाद्यांना लक्ष्य केलं होतं. भारतीय लष्कराच्या या शौर्याचं सर्वत्र कौतुक होत आहे. दरम्यान, योगगुरू रामदेव बाबा यांनीही यावर आता प्रतिक्रिया दिली आहे. आता आपण लाहोर आणि कराचीमध्येही तिरंगा फडकवला पाहिजे, असे रामदेव म्हणाले आहेत. ते एएनआयला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

रामदेव बाबा म्हणाले, “आता आपण लाहोर आणि कराचीमध्येही तिरंगा फडकवला पाहिजे. सैन्याने आपले शौर्य दाखवले आहे. त्यांनी आमच्या निष्पाप नागरिकांना मारले आणि आमच्या माता-भगिनींचे कुंकू पुसून टाकले, म्हणून आमच्या सैन्याने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत त्या दहशतवाद्यांना ठार मारले.

पीओके ताब्यात घ्यावं

बाबा रामदेव म्हणाले, आता आपल्या सैन्याने पीओके परत घ्यावे. आपण कराची आणि लाहोरमध्ये आपला तिरंगा फडकवला पाहिजे. पाकिस्तानात लपून बसलेल्या १०० हून अधिक दहशतवाद्यांना लष्कराने ठार मारले आहे. दहशतवाद्यांना नरकातल्या हुरींमध्ये जाण्याची घाई होती, म्हणून सैन्याने त्यांना तिथे पाठवले.” रामदेव बाबा यांनी सिंध आणि बलुचिस्तानमध्ये उठणाऱ्या निषेधाच्या आवाजाचाही उल्लेख केला.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यापासून भारतात तीव्र संताप व्यक्त केली जात होती. पाकिस्तानला धडा शिकवला जावा, अशी मागणी केली जात होती. आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील भारताला समर्थन मिळत होतं. गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारच्या उच्चस्तरीय बैठका होत असताना लवकरच काहीतरी मोठं घडण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्याचं उत्तर आता मिळालं असून भारतानं पाकव्याप्त जम्मू-काश्मीर (POJK) आणि थेट पाकिस्तानच्या हद्दीत १०० किमीपर्यंत कारवाई करत तब्बल ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले आहेत.

तसंच, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली असून त्यांना ऑपरेशन सिंदूरबाबत माहिती देण्यात आली. या बैठकीत एअर स्ट्राईक आणि उद्ध्वस्त झालेले दहशतवादी तळ याचीही माहिती मोदींनी राष्ट्रपतींना दिली.