Operation Sindoor : जम्मू काश्मीरच्या पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेल्या ९ दहशतवादी तळांवर करावाई करत तळांना उद्ध्वस्त केलं. तसंच त्यानंतर पाकिस्तानने भारताच्या सीमेवर केलेल्या ड्रोन हल्ल्याला देखील चोख प्रत्युत्तर देत पाकिस्तानला धडा शिकवला. भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये १०० पेक्षा जास्त दहशतवादी ठार झाल्याची माहिती भारतीय सैन्य दलाकडून देण्यात आली.
यानंतर आता भारतीय सैन्यांनाकडून ऑपरेशन सिंदूरबाबतचे काही व्हिडीओ शेअर करण्यात येत आहेत. त्यामध्ये ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून दहशतवादी तळांवर कशा पद्धतीने कारवाई केली? दहशतवादी तळांना कशा प्रकारे उद्ध्वस्त करण्यात आलं? या संदर्भातील माहिती सांगण्यात येत आहे. तसेच भारताने पाकिस्तानला कशा प्रकारे चोख प्रत्युत्तर दिलं हे देखील भारतीय सैन्याकडून सांगण्यात आलं आहे.
दरम्यान, भारतीय लष्कराच्या चिनार कॉर्प्सने पाकव्याप्त काश्मीरमधील लीपा व्हॅलीमधील लष्करी छावण्या आणि दहशतवादी तळांना पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आल्याचं एका अधिकाऱ्यांच्या हवाल्याने पीटीआयने वृत्त दिलं असल्याचं टाइम्स ऑफ इंडियाच्या एका वृत्तात म्हटलं आहे. भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांना विश्वास आहे की ज्या ठिकाणी भारताने कारवाई केली आणि तेथे जे नुकसान झालं त्या इमारती पुन्हा बांधण्यासाठी पाकिस्तानला किमान ८ ते १२ महिन्यांचा कालावधी लागेल.
भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्याने काय सांगितलं?
“आम्ही कमीत कमी तीन चौक्या, एक दारूगोळ्याचा डेपो, इंधन साठवणूक केलेला भाग आणि तोफखाना पूर्णपणे नष्ट केला आहे. आमचं प्रत्युत्तर इतकं मोठं होतं की पाकिस्तानला आता त्या ठिकाणी पुन्हा बांधकाम करण्यासाठी किमान ८-१२ महिने लागतील किंवा कदाचित जास्त वेळ लागेल”, असं लष्कराच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं आहे.
तसेच दुसऱ्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, “पाकिस्तानी सैन्याने भारतीय चौक्यांवर हल्ला करण्यासाठी हवाई हल्यात जड शस्त्रांचा वापर केला. मात्र, पाकिस्तानी सैन्याला भारताचं कोणतंही नुकसान करता आलं नाही. आमच्या स्वदेशी विकसित रडार सिस्टीमने उत्कृष्ट कामगिरी केली. आमच्या हवाई संरक्षण तोफांनी त्यांच्या हवाई तळांना पूर्णपणे निष्क्रिय केलं. यामध्ये शत्रूचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं”, असं दुसऱ्या एका अधिकाऱ्याने पीटीआयशी बोलताना सांगितल्याचं वृत्तात म्हटलं आहे.
तसेच लीपा व्हॅलीमध्ये अनेक रिकाम्या लष्करी इमारती असल्या तरी भारतीय सैन्याने अशा ठिकाणी हल्ला करण्याचा निर्णय घेतला तेथे सर्वात जास्त नुकसान होऊ शकतं. दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार चिनार कॉर्प्सच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्याने केलेल्या कारवाईत ६४ पाकिस्तानी लष्करी जवान ठार झाले आणि ९६ जण जखमी झाले. यामध्ये संदेश स्पष्ट होता की, आमचं प्रत्युत्तर १:३ च्या प्रमाणात आहे”, असं चिनार कॉर्प्सच्या एका अधिकाऱ्याने म्हटलं आहे.
दरम्यान, पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ७ मे रोजी पीओकेमधील मुझफ्फराबादजवळ झालेल्या २५ मिनिटांच्या कारवाईबाबत माहिती देताना अधिकाऱ्यांनी सांगितलं की, “हे हल्ले इतके जोरदार होते की पीओकेच्या ७५ व्या इन्फंट्री ब्रिगेडच्या कमांडरने सैनिकांना जीव वाचवण्यावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितलं होतं.”