Operation Sindoor Parliament discussion : संसदेचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरू असून यामध्ये ऑपरेशन सिंदूरच्या मुद्द्यावर विरोधक आणि सत्ताधारी लवकरत एकमेकांसमोर येणार आहेत. संसंदेत चालू पावसाळी अधिवेशनादरम्यान २८ जुलै रोजी ऑपरेशन सिंदूरवर चर्चा केली जाणार आहे. या विशेष चर्चेसाठी सरकारकने लोकसभा आणि राज्यसभा या दोन्हींसाठी प्रत्येकी १६ तासांचा वेळ दिली आहे. इंडिया टुडेने यासंबंधीचे वृत्त दिले आहे. तसेच विरोधकांकडून उपस्थित केल्या जाणाऱ्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृह मंत्री अमित शाह आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे या चर्चेत सहभागी होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पुढील आठवड्यात सोमवारी म्हणजेच २८ जुलै रोजी लोकसभेत या चर्चेला सुरूवात होईल, त्यानंतर राज्यसभेत मंगळवारी (२९ जुले) रोजी चर्चा होईल. सरकारने दोन्ही सभागृहांमध्ये या चर्चेसाठी भरपूर वेळ दिला आहे, मात्र विरोधकांकडून या मुद्द्यावर उद्यापासूनच चर्चा घेतली जावी अशी मागणी केली जात होती. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्याचे कारण देत सरकारने ही मागणी फेटाळली.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प वारंवार दावा करत आहेत की त्यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शस्त्रविराम घडवून आणला. सरकारने याचे खंडन केले आहे. मात्र ट्रम्प यांच्या विधानाचा वापर विरोधकांकडून सत्ताधारी पक्ष आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर दबाव टाकण्यासाठी केला जात आहे. विरोधक पंतप्रधान मोदी यांनी स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी करत आहेत. या पार्श्वभूमीवर या संबंधित चर्चेकडे संपूर्ण देशाचे लक्ष असणार आहे.
गेल्या आठवड्यापासून ऑपरेशन सिंदूरवर चर्चेची मागणी वाढताना पाहायला मिळत होती, ज्यामध्ये विरोधी पक्षाच्या खासदार पहलगाम दहशतवादी हल्ला आणि बिहारमधील स्पेशल इटेन्शिव्ह रिव्हिजन ऑफ इलेक्टोरल रोल्सवर उत्तरे देण्याची मागणी केली होती. तसेच विरोधकांनी वेगवेगळ्या नियमांच्या अंतर्गत विविध प्रशांवर कमी कालावधीच्या चर्चा घेण्याचीही मागणी केली आहे. तसेच नियमित चर्चेसाठी बिझनेस अॅडव्हाजरी कमिटी (बीएस)ची दर आठवड्याला बैठक घेण्याची मागणीही केली आहे.
सरकारकडून विशेष तयारी
इंडिया टुडेने सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, सरकार त्यांची बाजू पूर्ण आक्रमकतेने मांडण्यासाठी तयारी करत आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी चीफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान, संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह आणि तिन्ही दलांच्या प्रमुखांबरोबर सरकारच्या प्रतिसादाचे अंतिम स्वरूप निश्चित करण्यासाठी अनेक उच्चस्तरीय बैठका घेतल्या आहेत. कारगिल विजय दिवस म्हणजेच २६ जुलै रोजीच्या उत्सवानंतर ही चर्चा आयोजित करण्यात आली आहे.
७ मे रोजी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आले होते, ज्यामध्ये पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांना लक्ष्य करत हल्ले करण्यात आले होते.