पीटीआय, पाटणा
केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी अल्पसंख्याक समुदायावर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याने पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. शनिवारी बिहारच्या अरवल जिल्ह्यात एका जाहीर सभेत बोलताना त्यांनी अल्पसंख्यांकांची मते आपल्याला नकोत, असे म्हणत आक्षेपार्ह टिप्पणी केली.
सभेत बोलताना सिंह म्हणाले की, रालोआ सरकार समाजाच्या प्रत्येक घटकासाठी काम करते, परंतु मुस्लीम मतदार भाजपला मतदान करत नाहीत. सिंह यांच्या वक्तव्यावर विरोधकांनी टीका केली आहे. ‘‘भाजप नेते हिंदू-मुस्लीम मुद्दय़ांव्यतिरिक्त इतर कोणत्याही गोष्टीवर बोलू शकत नाहीत हे सर्वज्ञात आहे. ते वाढती बेरोजगारी, महागाई, चांगले शिक्षण आणि वैद्यकीय सुविधांबद्दल बोलू शकत नाहीत. त्यांच्याशी विकासाबद्दल बोलले की ते हिंदू-मुस्लीम मुद्दय़ांवर चर्चा करू लागतात आणि लोकांचे लक्ष मुख्य मुद्दय़ांपासून विचलित करण्याचा प्रयत्न करतात,’’ अशी टीका ‘राजद’चे प्रवक्ते मृत्युंजय तिवारी यांनी केली.
ज्यांनी स्वातंत्र्य चळवळीदरम्यान ब्रिटिशांना पाठिंबा दिला त्यांनाच विश्वासघातकी म्हटले पाहिजे अशी टिप्पणी अपक्ष खासदार पप्पू यादव यांनी केली. दुसरीकडे, भाजपचा मित्रपक्ष असलेल्या ‘जदयू’चे प्रवक्ते नीरज कुमार यांनी सावध प्रतिक्रिया देताना, गिरीराज सिंह हे त्यांना हवे तसे शब्द वापरण्यास मुक्त आहेत, असे म्हटले.
मी एकदा मौलवींना विचारले की त्यांच्याकडे आयुष्मान भारत आरोग्य कार्ड आहे का? त्यावर त्यांनी होकारार्थी उत्तर दिले. मला मतदान केले का या प्रश्नाचे उत्तर मात्र त्यांनी नकारार्थी दिले. मुस्लिमांना सर्व केंद्रीय योजनांचा फायदा होतो पण ते आम्हाला मतदान करत नाहीत. त्यांनी मला मतदान केले नाही यात माझा काय दोष? – गिरीराज सिंह, केंद्रीय मंत्री