Pakistan Link Of Pahalgam Terror Attack : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्लाच्या हल्लेखोरांशी पाकिस्तानचा थेट संबंध असल्याचे पुरावे सापडल्याचे भारताने आंतरराष्ट्रीय समुदायाला कळवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १३ जागतिक नेत्यांशी फोनवर केलेली चर्चा, दिल्लीतील ३० हून अधिक राजदूत, परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री आणि परराष्ट्र मंत्रालयातील इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकींचा हा भाग आहे.

पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी आणि द रेझिस्टन्स फ्रंट या दहशतवादी संघटनेचे “इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर” पाकिस्तानातील किमान दोन ठिकाणी सापडले असल्याची माहिती भारताने परदेशी नेते आणि राजदूतांना दिली आहे. याचबरोबर असेही सांगण्यात आले आहे की, काही दहशतवाद्यांची ओळख पटली असून, त्यांच्या भूतकाळातील कारवाया आणि दहशतवादी हल्ल्यांमधील सहभागाची पुष्टी केल्यानंतर ते पाकिस्तानातून आल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत इंडियन एक्सप्रेसने वृत्त दिले आहे.

भारताने पाकिस्तानविरुद्ध कठोर राजनैतिक पावले उचलण्यास सुरुवात केली असून, या हल्ल्यात पाकिस्तानचा सहभाग सिद्ध करण्यासाठी पुरेसे पुरावे असल्याचे सांगितले आहे.

या संकटाच्या काळात भारताला पाठिंबा दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी पाठिंबा देणाऱ्या देशांचे आभार मानले आहेत.

याचबरोबर सर्व परदेशी नागरिकांसाठी भारत भारत सुरक्षित आहे. त्यामुळे कोणत्याही देशाने त्यांच्या नागरिकांसाठी ट्रॅव्हल अॅडव्हाझरी जारी करण्याची घाई करण्याची गरज नसल्याचे भारताने म्हटले आहे. दरम्यान, अमेरिका आणि ब्रिटनने त्यांच्या नागरिकांसाठी ट्रॅव्हल अॅडव्हाझरी जारी केली आहे.

दरम्यान, २२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनेने पर्यटकांवर बेछूट गोळीबार केला होता. यामध्ये देशभारातील २५ आणि नेपाळचा एक अशा एकूण २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता.

या दहशवादी हल्ल्यानंतर भारताने कठोर भूमिका घेत पाकिस्तानवर अनेक निर्बंध लादले आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या सुरक्षा विषयक समितीची बैठक बोलावण्यात आली होती, ज्यामध्ये पाकिस्तानी नागरिकांना माघारी पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

परराष्ट्र मंत्रालयाने २४ एप्रिल रोजी एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, व्हिसा संबंधित हे नियम हिंदू असलेल्या आणि भारतात राहण्यासाठी दीर्घकालीन व्हिसा मिळालेल्या पाकिस्तानी नागरिकांना लागू होणार नाहीत. तसेच, जे लोक वैध कागदपत्रांसह पाकिस्तानला गेले आहेत त्यांना १ मे पूर्वी भारतात येण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.