Pahalgam Terro Attack Stories : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यामध्ये २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. हे सर्व पर्यटक भारताच्या वेगवेगळ्या भागातून तिथे दाखल झाले होते. मृतांमध्ये महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचादेखील समावेश आहे. काही प्रत्यक्षदर्शी, पीडितांचे नातेवाईक आणि प्रशासनातील व्यक्तींनी दहशतवादी गोळ्या झाडताना समोरच्याचा धर्म विचारत होते, अशी माहिती दिली. मात्र, त्याचबरोबर या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या एका पर्यटकाच्या पत्नीने तिथल्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत थेट सरकारला जाब विचारला आहे.
शैलेश कलाथिया हे मूळचे सूरतचे राहणारे होते. मुंबईतील एसबीआयच्या शाखेत ते ब्रँच मॅनेजर म्हणून कार्यरत होते. पत्नी शीतल व मुलांसह ४४ वर्षीय शैलेश पहलगाममध्ये सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी दाखल झाले होते. २२ एप्रिल रोजी दहशतवाद्यांच्या गोळीबारात शैलेश यांचादेखील मृत्यू झाला. गुरुवारी सूरतमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र, यावेळी त्यांच्या पत्नी शीतल यांनी त्यांच्या संतप्त भावनांना वाट मोकळी करून दिली.
केंद्रीय मंत्र्यांसमोरच व्यक्त केला संताप!
केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील, गुजरातचे गृहराज्यमंत्री हर्ष संघवी, शिक्षण मंत्री प्रफुल्ल पनशेरिया यांच्यासह इतर नेतेमंडळींनी गुरुवारी शैलेश कलाथिया यांच्या अंत्यसंस्कारांवेळी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी शीतल कलाथिया यांचं सांत्वन करण्याचा प्रयत्न केला असता त्यावर शीतल कलाथिया यांनी सी. आर. पाटील यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडल्या.
Flash:
— Yuvraj Singh Mann (@yuvnique) April 24, 2025
Shailesh Kalthiya from #Surat died in the terrorist attack in #Pahalgam.
His body was brought, where his final rites were conducted today.
Union Minister #CRPatil, State Home Minister Harsh Sanghavi, etc attended the funeral procession.#PahalgamTerroristAttack pic.twitter.com/mgZfPc9b1e
“आपल्याकडे हे कसलं सरकार आहे? तुम्ही काश्मीरला बदनाम करत आहात. पण इथे काश्मीरचा अजिबात मुद्दा नाहीये. अडचण ही सरकारच्या सुरक्षा व्यवस्थेची आहे. पहलगाममध्ये मोठ्या संख्येनं पर्यटक येतात. पण तिथे एकसुद्धा लष्करी जवान किंवा पोलीस अधिकारी उपस्थित नव्हता. कोणत्याही प्रकारची वैद्यकीय सुविधा तिथे नव्हती”, अशा शब्दांत शीतल कलाथिया यांनी संताप व्यक्त केला आहे.
“व्हीआयपींना सुरक्षा, मग करदात्यांच्या जिवाची किंमत नाही का?”
दरम्यान, यावेळी त्यांनी देशातील व्हिआयपी व्यवस्थेवरही बोट ठेवलं. “इथे व्हिआयपी लोकांना सुरक्षेसाठी मोठमोठे ताफे पुरवले जातात. मग सामान्य करदात्यांच्या जिवाची काहीच किंमत नाही का?” अशा शब्दांत त्यांनी मोदी सरकारला जाब विचारला आहे.
“तिथल्या बेस कॅम्पमधले लष्करी अधिकारी आम्हाला मदत करण्याऐवजी आम्हाला विचारत होते की तुम्ही पहलगामला जाताच कशाला? मी माझ्या आयुष्यातली सर्वात मूल्यवान व्यक्ती गमावली आहे. माझ्या मुलांनी त्यांच्या आयुष्याचा आधारस्तंभच गमावला आहे. माझ्या मुलांचं भवितव्य मला अजिबात उद्ध्वस्त होऊ द्यायचं नाहीये”, अशा व्यथा शीतल यांनी मांडल्या.
“कर भरूनही मदत मिळाली नाही”
“आम्ही वेळच्यावेळी कर भरूनदेखील जेव्हा माझ्या पतीला खरंच वैद्यकीय उपचारांची गरज होती, तेव्हा तिथे कोणतीही सुविधा नव्हती. मला न्याय हवाय. आता सरकारनं मला सांगावं की आता सरकार काय करणार आहे. इथे फक्त माझ्या पतीचा मृत्यू झालेला नाही. अशा अनेक लोकांना त्यांच्या मुलाबाळांसमोर मारण्यात आलं आहे. सरकारनं आता भविष्याच्या दृष्टीने विचार करायला हवा. माझ्या मुलीला डॉक्टर व्हायचं आहे. माझ्या मुलाला इंजिनिअर व्हायचं आहे”, असं शीतल कलाथिया म्हणाल्या.