Youth Who Helped Terrorists In Pahalgam Attack Arrested: जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पाच महिन्यांनी, सुरक्षा यंत्रणांनी बुधवारी पाकिस्तानातील द रेझिस्टन्स फ्रंटच्या दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या काश्मीरमधील एका तरुणाला अटक केली आहे. दहशतवाद्यांना विविध प्रकारची मदत केल्याबद्दल पुरवल्याबद्दल पोलिसांनी कुलगाम येथील २६ वर्षीय मोहम्मद युसूफ कटारिया याला अटक केली आहे. अटकेनंतर त्याला १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

ऑपरेशन महादेव दरम्यान जप्त केलेल्या शस्त्रास्त्रांच्या विश्लेषणानंतर कटारियाला अटक करण्यात आली आहे, असे सूत्रांनी सांगितल्याचे वृत्त इंडिया टुडेने दिले आहे. सूत्रांनी सांगितले की, कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करणारा कटारिया काही महिन्यांपूर्वी दहशतवाद्यांच्या संपर्कात आला होता. पहलगाम हल्ल्यादरम्यान त्याने दहशतवाद्यांना विविध प्रकारे मदत केली होती.

तपासात असेही समोर आले आहे की, या तरुणाने पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या काही महिन्यांपूर्वी लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांना कुलगामच्या जंगलातील रस्ते दाखवले होते.

जूनमध्ये, राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आश्रय आणि रसद पुरवणाऱ्या दोन व्यक्तींना अटक केल्याची माहिती दिली होती. परवेझ अहमद जोथर आणि बशीर अहमद जोथर अशी या दोघांची नावे आहेत. त्यांनी हल्ल्यात सहभागी असलेल्या तीन दहशतवाद्यांची नावेही उघड केली आहेत.

एका महिन्यानंतर जुलैमध्ये, ऑपरेशन महादेव अंतर्गत सुरक्षा दलांनी लष्कर-ए-तोयबाचा टॉप कमांडर सुलेमान शाह, अफगाण आणि जिब्रान या तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.यानंतर दुसऱ्याच दिवशी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत पावसाळी अधिवेशनात बोलताना माहिती दिली की, मारले गेलेले तिन्ही दहशतवादी खरोखरच पहलगाम हल्ल्यात सहभागी होते आणि ते पाकिस्तानचे होते.

२२ एप्रिल रोजी, चार सशस्त्र दहशतवाद्यांनी पहलगाममधील बैसरन खोऱ्यात हल्ला केला होता. यामध्ये त्यांनी हिंदू पुरूषांना त्यांचा धर्म विचारून गोळ्या घातल्या होत्या. यामुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये मोठा लष्करी संघर्ष निर्माण झाला होता. भारताने ७ मे रोजी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर मधील दहशतवादी तळांवर ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून हवाई हल्ले केले होते. ज्यामध्ये ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त झाले होते. तर, १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले होते.