पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारतासंदर्भात आणि पंतप्रधान मोदींसदर्भात नवे विधान केले आहे. दोन शेजारी देशांमधील मतभेद दूर करण्यासाठी आपण नरेंद्र मोदी यांच्याशी दूरचित्रवाणीवरून चर्चा करू इच्छित असल्याचे इम्रान खान यांनी म्हटले आहे.

मंगळवारी इम्रान खान यांनी रशिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत याबाबत भाष्य केले आहे. “मला नरेंद्र मोदींसोबत टीव्हीवर वादविवाद करायला आवडेल. वादविवादाने मतभेद सोडवता आले तर ते उपखंडातील अब्जावधी लोकांसाठी फायदेशीर ठरेल. भारत हा शत्रू देश बनला, त्यामुळे त्यांच्यासोबतचा व्यापार कमीत कमी करण्यात आला आहे. सर्व देशांशी व्यापारी संबंध राखण्याचे आमच्या सरकारचे धोरण आहे,” असे इम्रान खान यांनी म्हटले आहे.

यासोबतच इम्रान खान म्हणाले की, पाकिस्तानचे धोरण सर्व देशांशी व्यावसायिक संबंध ठेवण्याचे आहे. इम्रान खान यांचे हे वक्तव्य त्यांचे व्यावसायिक सल्लागार अब्दुल रझाक दाऊद यांच्या अलीकडच्या टीकेशी सुसंगत आहे. दाऊद यांनी सोमवारी म्हटले होते की, भारतासोबत व्यापार करणे ही काळाची गरज आहे आणि ते पाकिस्तानसाठी अधिक फायदेशीर ठरेल.

अलीकडच्या काळात पाकिस्तानचे शेजारील चीनसोबतचे प्रादेशिक संबंध दृढ झाले आहेत. दोघांमधील आर्थिक संबंध पूर्वीपेक्षा अधिक घट्ट झाले आहेत. चीनने बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हचा एक भाग म्हणून पाकिस्तानमधील पायाभूत सुविधा आणि इतर प्रकल्पांवर अब्जावधी डॉलर्स खर्च करण्याचे वचन दिले आहे.

भारतासोबतच्या संबंधांबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पंतप्रधान इम्रान खान म्हणाले की, काश्मीर वाद सोडवण्यासाठी त्यांच्या सरकारने सत्तेत आल्यानंतर लगेचच भारताशी संपर्क साधला होता. पण, नाझींनी प्रेरित असलेल्या वर्णद्वेषी विचारसरणीने भारताचा ताबा घेतला असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

रशिया युक्रेन तणावरही केले भाष्य

अमेरिका, चीन आणि रशिया यांच्यातील अधिक सहकार्याचा मानवजातीला संघर्षापेक्षा जास्त फायदा होईल यावर पंतप्रधानांनी भर दिला. पाकिस्तान हा गॅसची कमतरता असलेला देश असताना, ज्या रशियन कंपनीशी पाकिस्तानची चर्चा सुरू आहे, त्या कंपनीवर अमेरिकेने घातलेल्या निर्बंधांमुळे देशाचा गॅस पाइपलाइन प्रकल्प लांबणीवर पडला असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. इराणवरील निर्बंध उठवल्यामुळे पाकिस्तानला शेजारील देशाकडून सर्वात स्वस्त गॅस मिळण्यास मदत होईल, असेही इम्रान खान म्हणाले.