पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे त्यांच्या वक्तव्यांसाठी नेहमीच चर्चेत असतात. इम्रान खान यांनी पंतप्रधान मोदींबाबत केलेल्या वक्तव्यावर आता काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रशिया दौऱ्यापूर्वी एका रशियन टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत एका प्रश्नाचं उत्तर देताना इम्रान खान यांनी, मला नरेंद्र मोदींसोबत टीव्हीवर चर्चा करायला आवडेल, असे म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी मंगळवारी भारतीय टीव्हीवर वादविवादांमध्ये कोणतेही प्रश्न सोडवले जात नाहीत, फक्त वाढतात, असे म्हटले आहे. “लढण्यापेक्षा वाद घालणे चांगले आहे, पण भारतातील टीव्ही चॅनेलवर प्रश्न सोडवले जात नाहीत. फक्त वाद आणखीनच वाढतो,” असे शशी थरुर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनीही इम्रान खान यांना उत्तर दिले आहे. पाकिस्तानमध्ये वाढणाऱ्या दहशतवादाला टीव्हीवरील चर्चेच्या माध्यमातून कसे हाताळता येईल. तुम्ही याबाबतीत गंभीर आहात का?, असे मनीष तिवारी यांनी म्हटले आहे. तर काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी म्हणाले की, “माझे राजकीय मतभेद असले तरी, आमच्या पंतप्रधानांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांसोबत टीव्ही वादविवाद करावा असे मला वाटत नाही. यामुळे दहशतवादाचा व्यापार करणाऱ्या पाकिस्तानला नैतिक आधार मिळेल. ते पूर्वीसारखेच खोटे बोलतील.”

काय म्हणाले होते इम्रान खान?

मंगळवारी इम्रान खान यांनी रशिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत याबाबत भाष्य केले आहे. “मला नरेंद्र मोदींसोबत टीव्हीवर वादविवाद करायला आवडेल. वादविवादाने मतभेद सोडवता आले तर ते उपखंडातील अब्जावधी लोकांसाठी फायदेशीर ठरेल. भारत हा शत्रू देश बनला, त्यामुळे त्यांच्यासोबतचा व्यापार कमीत कमी करण्यात आला आहे. सर्व देशांशी व्यापारी संबंध राखण्याचे आमच्या सरकारचे धोरण आहे,” असे इम्रान खान यांनी म्हटले आहे.

या मुलाखतीत इम्रान खान यांनी असाही आरोप केला होता की, त्यांच्या पुढाकारानंतरही भारताच्या बाजूने वाटाघाटी करण्याचा कोणताही प्रयत्न झाला नाही. “माझा पक्ष सत्तेवर आला तेव्हाच मी भारताकडे हात पुढे केला. आम्ही बोलून प्रश्न सोडवू, असे सांगितले. मी भारतासोबत १० वर्षे क्रिकेट खेळलो, पण जेव्हा मी मैत्रीचा हात पुढे केला तेव्हा मला वाटले की आता भारत तो राहिलेला नाही. तेथे कट्टरतावादी विचारसरणीने जोर धरला आहे,” असे इम्रान खान यांनी म्हटले.

इम्रान खान २३ फेब्रुवारीला रशियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दोन दिवसांच्या दौऱ्यात ते राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचीही भेट घेणार आहेत. दोन दशकांत पाकिस्तानी नेत्याची ही पहिलीच रशियाला भेट आहे. इम्रान खान यांना युक्रेनवरही प्रश्न विचारण्यात आला. यावर, या प्रकरणाशी आमचा काहीही संबंध नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pak pm imran khan wishes tv debate with pm modi congress shashi tharoor replies abn
First published on: 23-02-2022 at 09:44 IST