scorecardresearch

संवाद प्रक्रिया रखडवण्यासाठी पठाणकोट हल्ल्याचे ‘निमित्त’

पाकिस्तानचा भारतावर आरोप

पाकिस्तानचा भारतावर आरोप
पठाणकोट दहशतवादी हल्ल्याचा वापर भारत दोन्ही देशांमधील संवाद प्रक्रिया रखडवण्यासाठीचे ‘निमित्त’ म्हणून करत असल्याचा आरोप पाकिस्तानने केला आहे. दहशतवादाशी संबंधित असलेल्या ‘परस्परचिंतेसह’ सर्व मुद्दे सोडवण्यासाठी बोलणी हाच सर्वोत्तम मार्ग असल्याचे मतही पाकने व्यक्त केले.
शांततामय शेजार हा पाक सरकारच्या धोरणाचा भाग असल्याचे सांगून पाकिस्तानी पंतप्रधानांचे परराष्ट्र व्यवहारविषयक सल्लागार सरताज अझीझ म्हणाले, की डिसेंबर २०१५ मध्ये भारतीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज पाकिस्तान भेटीवर आल्या असताना भारत व पाकिस्तान यांनी संवादाची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यास मान्यता दिली होती.
मात्र दोन्ही देशांच्या परराष्ट्र सचिवांनी भेटून सर्वसमावेशक संवाद प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याच्या वेळापत्रकाला अंतिम रूप देण्यापूर्वीच २ जानेवारी २०१६ रोजी पठाणकोटची घटना घडली आणि त्यामुळे ही प्रक्रिया पुढे ढकलण्यासाठी भारताला निमित्त मिळाले, असा उल्लेख अझीझ यांनी केला.
दहशतवादाशी संबंधित दोन्ही देशांच्या चिंतेचा विषय असलेल्या मुद्दय़ांसह सर्व प्रलंबित मुद्दे निकाली काढण्याचा प्रयत्न करण्यासाठी संवाद हाच सर्वात चांगला मार्ग असल्याची पाकिस्तानची भूमिका आहे. पाकिस्ताने आपले संयुक्त तपास पथक भारतात पाठवून, या हल्ल्याशी संबंध असल्याचा आरोप असलेल्यांचा तपास यापूर्वीच सुरू केला आहे, असेही अझीझ यांनी नमूद केले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-06-2016 at 00:16 IST

संबंधित बातम्या