Pakistan at Organisation of Islamic Cooperation : पाकिस्तान हा सातत्याने भारताविरोधात गरळ ओकत आला आहे. हा देश जागतिक स्तरावर भारताविरोधात प्रचार करण्याचा प्रयत्न करताना दिसतो. प्रामुख्याने मुस्लीम राष्ट्रांमध्ये भारताबाबत अपप्रचार करतो. मात्र, मुस्लीम मित्रराष्ट्रांमध्ये भारताबाबत अपप्रचार करण्याचा प्रयत्न करत असलेल्या पाकिस्तानला तीन मोठ्या मुस्लीम राष्ट्रांनी धक्का दिला आहे.
५७ मुस्लीम देशांचा सहभाग असलेल्या आंतरराष्ट्रीय इस्लामिक संघटनेच्या (Organisation of Islamic Cooperation) बैठकीत पाकिस्तानने भारताविरोधात प्रस्ताव मांडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, जगातील सर्वात मोठं मुस्लीम राष्ट्र अशी ओळख असलेल्या इंडोनिशियाने त्यास विरोध केला. विशेष म्हणजे इंडोनेशिया या बैठकीच्या यजमानपदी असून त्यांनीच या बैठकीचं आयोजन केलं होतं.
तीन देशांचा पाकिस्तानला विरोध

इंडोनेशियाव्यतिरिक्त बाहरीन व इजिप्तने देखील पाकिस्तानच्या या प्रयत्नांचा विरोध केला आहे. इकोनॉमिक टाइम्सने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. १२ मे रोजी ओआयसीच्या संसदीय युनियनची बैठक पार पडली होती. या बैठकीत पाकिस्ताने भारताविरोधात कुरापत करण्याचा प्रयत्न केला. मात्र तीन मोठ्या मुस्लीम राष्ट्र्रांनी पाकिस्तानचा विरोध केला. परिणामी पाकिस्तान नरमला आहे.

ओआयसीची संयमी शब्दांत प्रतिक्रिया

ओआयसीच्या संसदीय संघाच्या ठरावात गाझावरील हल्ल्यांबाबत इस्रायलचा तीव्र निषेध करण्यात आला आहे. ओआयसीने भारताविरोधातही अशीच भूमिका घ्यावी अशी पाकिस्तानची इच्छा होती. मात्र, ओआयसीने अतिशय संयमी शब्दांत यावर भाष्य केलं आहे. कारण यजमान इंडोनेशियासह इजिप्त व बाहरीनने पाकिस्तानच्या प्रयत्नांना विरोध केला.

भारत-इंडोनेशियाचे संबंध दृढ

अलीकडेच इंडोनेशियाने इस्लामिक स्टेटचे दोन दशतवादी अब्दुल्ला फैज व तल्हा खान या दोघांना भारताच्या ताब्यात (प्रत्यार्पण) दिलं आहे. इंडोनेशियाकडून करण्यात आलेलं हे प्रत्यार्पण दोन देशांमधील चांगल्या संबंधांचं प्रतीक आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इंडोनेशिया व भारताचे संबंध अलीकडच्या काळात उत्तम झाले आहेत. इंडोनेशियाचे अध्यक्ष सुबियांतो हे प्रजासत्ताक दिनी देशाचे प्रमुख पाहुणे म्हणून भारतात आले होते. तसेच भारताच्या विनंतीनंतर त्यांनी पाकिस्तानला जाणं टाळलं होतं. त्याचबरोबर काश्मीरच्या मुद्द्यावर त्यांनी भारताचं समर्थन केलं होतं. पहलगाम हल्ल्यानंतर इंडोनशियाने त्या हल्ल्याचा निषेध नोंदवला होता. दुसऱ्या बाजूला भारताचे इजिप्त व बाहरीनबरोबरचे व्यावसायिक संबंध अधिक दृढ झाले आहेत.