India-Pakistan News Updates: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ले केले होते. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यामातून केलेल्या या लष्करी कारवाईनंतर पाकिस्तान सातत्याने भारतातील शहरांवर हल्ले करण्याचा प्रयत्न करत आहे. अशात पाकिस्तानने काल भारतातील काही रुग्णालये आणि शाळांवर हल्ले केल्याची माहिती भारतीय लष्कराच्या अधिकारी कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली आहे.
शनिवारी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलताना परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानच्या प्रक्षोभक आणि उत्तेजक कृती करत आहे. कर्नल सोफिया कुरेशी यांनी पत्रकार परिषदेत पुढे सांगितले की, पाकिस्तानने पंजाबमधील हवाई तळावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. कर्नल कुरेशी यांनी असेही सांगितले की, पाकिस्तानी सैन्य सीमावर्ती भागात त्यांचे सैन्य हलवत असल्याचे दिसून आले आहे. लष्करी तळांना लक्ष्य करण्याव्यतिरिक्त, पाकिस्तानने श्रीनगर, अवंतीपुरा आणि उधमपूरमधील वैद्यकीय सुविधांनाही लक्ष्य केले, असे कुरेशी यांनी शनिवारी सकाळी सांगितले.
यावेळी माहिती देताना कर्नल सोफिया कुरेशी म्हणाल्या की, “पाकिस्तानी सैन्य पश्चिम सीमेवर सतत हल्ले करत आहे. त्यांनी भारताच्या लष्करी ठिकाणांवर हल्ला करण्यासाठी ड्रोन, लांब पल्ल्याची शस्त्रे, युद्धसामग्री आणि लढाऊ विमानांचा वापर केला आहे. भारताने त्यांचे अनेक हल्ले निष्प्रभ केले आहेत. पाकिस्तानने २६ हून अधिक ठिकाणी हवाई मार्गाने घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. यामुळे उधमपूर, भूज, पठाणकोट, भटिंडा येथील हवाई दलाच्या तळांवर भारताची उपकरणे आणि जवानांना फटता बसला आहे. त्यांनी पहाटे १:४० वाजता पंजाबच्या हवाई तळाला लक्ष्य करण्यासाठी हाय-स्पीड क्षेपणास्त्रांचा वापर केला. याचबरोबर पाकिस्तानने भारतातील आरोग्य सुविधा आणि शाळांवरही हल्ला केला.”
दरम्यान, शनिवारी सकाळी पाकिस्तानी हवाई दलाच्या विमानांनी श्रीनगरमध्ये हल्ला करण्याचा प्रयत्न केला, याला भारतीय सशस्त्र दलांनी प्रभावीपणे प्रत्युत्तर दिले. शुक्रवारी रात्री आणि शनिवारी सकाळी पाकिस्तानने भारतीय सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये अनेक ड्रोन हल्ले केले. परंतु, भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेने परतावून लावले.
यावेळी परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तान पसरवत असल्याचे स्पष्ट केले. पाकिस्तानचे भारतीय पायाभूत सुविधांचे गंभीर नुकसान झाल्याचे दावे पूर्णपणे खोटे असल्याचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी धार्मिक स्थळावर क्षेपणास्त्र डागल्याच्या पाकिस्तानच्या दाव्यांचेही यांनी खंडन केले आणि हे दावे हास्यास्पद असल्याचे म्हटले.
विंग कमांडर व्योमिका सिंग यांनीही म्हटले की, पाकिस्तानने दुर्भावनापूर्ण चुकीच्या माहितीच्या मोहिमेचा प्रयत्न केला आहे. आपली एस-४०० प्रणाली आणि सुरत येथील हवाई तळ नष्ट करण्याचे त्यांचे दावे खोटे आहेत, असे त्या म्हणाल्या.